केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे InvIT नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध

मुंबई,​२८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-​केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत मुंबई शेअर बाजारात आज सकाळी 9.15 वाजता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे InvIT नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर सूचीबद्ध झाले. गडकरी यांनी घंटा वाजवून या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब केले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या सचिव आणि प्राधिकरणाच्या अध्यक्ष  अलका उपाध्याय यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. सर्व संस्थात्मक आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आणि प्राधिकरणाच्या विश्वासार्हतेवर विश्वास दाखवल्याबद्दल गडकरी यांनी त्यांचे आभार मानले.

मुंबई शेअर बाजारात InvIT नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर सूचीबद्ध होणे ही ऐतिहासिक घटना आहे, कारण यामुळे पायाभूत सुविधा संबंधी निधी पुरवठ्यामध्ये लोकसहभागाचा प्रवेश अधोरेखित होतो, असे नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 25% एनसीडी राखीव ठेवल्या आहेत असे सांगत, InvIT च्या दुसऱ्या फेरीला सुरुवात झाल्यापासून अवघ्या 7 तासांत जवळपास सातपट अतिरिक्त मागणी नोंदवण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली. ही गुंतवणूक सर्वाधिक विश्वासार्ह असून वार्षिक 8.05 % इतके उत्पन्न देते, असे ते म्हणाले. या माध्यमातून किरकोळ गुंतवणूकदारांना (सेवानिवृत्त नागरिक, पगारदार व्यक्ती, छोटे आणि मध्यम व्यावसायिक) राष्ट्र उभारणीच्या उपक्रमात सहभागी होण्याची संधी आपण देऊ शकलो, याचा आपल्याला मनापासून आनंद वाटत असल्याचे गडकरी यांनी सांगितले. 10,000 रुपये इतक्या किमान गुंतवणुकीपासून सुरूवात करणे शक्य असल्याची माहितीही त्यांनी दिली.

रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये अंतर्गत लाभ दर खूप चांगला आहे, असे गडकरी म्हणाले. 26 नव्या द्रुतगती मार्गांसह अन्य काही प्रकल्प नियोजित आहेत ज्यांमुळे गुंतवणुकीच्या आणखी संधी उपलब्ध होणार आहेत, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील पाच ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था साकारण्यासाठी पायाभूत सुविधा प्रकल्पांमधील गुंतवणूक कायम ठेवण्याचे आवाहन गडकरी यांनी गुंतवणुकदारांना केले. पायाभूत सुविधा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या वर्धनक्षम असतात आणि त्यातून चांगला परतावा मिळतो,  असे ते म्हणाले.

पंतप्रधानांच्या दृष्टीतील ‘आत्मनिर्भर भारत’ घडविण्यासाठी रोखे ही उत्तम संधी असल्याचे गडकरी यांनी सांगितले. पायाभूत सुविधा विशेषतः रस्ते बांधण्यासाठी मोठी गुंतवणूक महत्त्वाची ठरते. रस्त्यांमुळे देशाचा सामाजिक-आर्थिक विकास शक्य होतो, असे सांगून गडकरी यांनी विश्वास व्यक्त केला की येत्या काळात किरकोळ गुंतवणुकदार या प्रकल्पांमध्ये मोठ्या संख्येने गुंतवणूक करतील आणि पुढे, हळूहळू संस्थात्मक गुंतवणुकदारांना मागे टाकतील.