60 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीची गुंतवणूक गुजरातमधील युवकांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण करेल-पंतप्रधान नरेंद्र मोदी 

नवी दिल्ली​,​२८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-​आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया च्या हजिरा पार्क इथल्या प्रकल्पाच्या विस्तारीकरण समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या  माध्यमातून मार्गदर्शन केले.

या पोलाद प्रकल्पामुळे केवळ, गुंतवणूकच येणार नाही, तर अनेक संधीची दारेही खुली होणार आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. “60 हजार कोटींपेक्षा अधिक रुपयांची गुंतवणूक गुजरात आणि देशभरातील युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करेल. या विस्तारीकरणानंतर,हाजिरा पोलाद प्रकल्पाची उत्पादन क्षमता 9 दशलक्ष टनांवरुन, 15 दशलक्ष टनांपर्यंत वाढेल.” अशी माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली.

भारताला 2047 पर्यंत, विकसित राष्ट्र बनवण्यात पोलाद प्रकल्पाची भूमिका अतिशय महत्वाची ठरणार आहे, असे पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केले. पोलाद क्षेत्र भक्कम असेल, तर, आपण मजबूत पायाभूत सुविधांची उभारणी करु शकतो. त्याचप्रमाणे, रस्तेबांधणी, रेल्वे, विमानतळ,बंदरे, बांधकाम क्षेत्र, वाहनउद्योग, भांडवली वस्तू आणि अभियांत्रिकी अशा कसर्व त्रात पोलाद उद्योगाचे महत्वाचे योगदान आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

या विस्तारीकरणासोबतच, नवे तंत्रज्ञानही भारतात येत आहे.ज्याचा इलेक्ट्रिक वाहने, वाहननिर्मिती आणि इतर उत्पादन क्षेत्रात मोठा उपयोग होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. “आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडियाचा प्रकल्प, मेक इन इंडियाच्या संकल्पनेला मूर्त स्वरुपात आणण्याच्या प्रवासातील मैलाचा दगड सिद्ध होईल, अशी मला खात्री आहे. यामुळे, पोलाद क्षेत्रात भारताला एक विकसित राष्ट्र आणि आत्मनिर्भर राष्ट्र बनण्याची शक्ती मिळेल.” असेही पंतप्रधान म्हणाले.

जगाला भारताकडून असलेल्या अपेक्षांचा उल्लेख करत, पंतप्रधान म्हणाले की, आज भारत जगाचे सर्वात मोठे उत्पादन केंद्र म्हणून विकसित होत आहे. आणि ह्या क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक ती धोरणे आखण्यासाठी केंद्र सरकार सक्रियपणे प्रयत्न करत आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“गेल्या 8 वर्षांमध्‍ये सर्वांनी केलेल्या  प्रयत्नांमुळे, भारतीय पोलाद उद्योग हा जगातील दुसरा सर्वात मोठा पोलाद उत्पादक उद्योग बनला आहे. या उद्योगात विकासाची प्रचंड क्षमता आहे”, असेही ते म्हणाले.

भारतीय पोलाद उद्योगाला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधानांनी उपाययोजनांची यादीच सादर  केली. ते म्हणाले की, पीएलआय म्हणजेच उत्‍पादनावर आधारित प्रोत्साहन  योजनेमुळे  या उद्योगाच्या विस्तारासाठी  नवीन मार्ग तयार झाले  आहेत. आयएनएस  विक्रांतचे उदाहरण देताना, पंतप्रधान मोदी यांनी  सांगितले की, देशाने उच्च दर्जाच्या स्टीलमध्ये कौशल्य प्राप्त केले आहे, त्याचा वापर महत्वपूर्ण  धोरणात्मक अनुप्रयोगांमध्ये वाढत्या प्रमाणावर केला जात आहे. पंतप्रधान म्हणाले की, डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी विमानवाहू नौकेत वापरण्यात येणारे विशेष स्टील विकसित केले आहे. भारतीय कंपन्यांनी हजारो मेट्रिक टन स्टीलचे उत्पादन केले. आणि आयएनएस विक्रांत स्वदेशी क्षमता आणि तंत्रज्ञानाने पूर्णपणे सज्ज होती. इतक्या प्रचंड  क्षमतेच्या उद्योगाला चालना देण्यासाठी, देशाने आता कच्च्‍या  पोलादाची उत्पादन क्षमता दुप्पट करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. आपण सध्या 154 मेट्रिक टन कच्चे स्टीलचे उत्पादन करतो. पुढील 9-10 वर्षांत 300 मेट्रिक टन उत्पादन क्षमता गाठण्याचे आपले लक्ष्य आहे.

विकासाचे स्वप्न साकारत असताना येणाऱ्या आव्हानांकडे लक्ष वेधताना  पंतप्रधानांनी पोलाद उद्योगासाठी कार्बन उत्सर्जनाचे उदाहरण दिले. त्यांनी स्पष्ट केले की,  एकीकडे भारत कच्च्या पोलादाच्या उत्पादनाची क्षमता वाढवत आहे आणि दुसरीकडे पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले”,  केवळ कार्बन उत्सर्जन कमी करण्‍याचा प्रयत्न केला जात  नाही तर कार्बन जमा करून त्याचा पुनर्वापर करता येवू शकेल, भारत अशा प्रकारचे उत्पादन तंत्रज्ञान विकसित करण्यावर आज भर देत आहे.” यामुळे देशात चक्राकार अर्थव्यवस्थेलाही प्रोत्साहन  दिले जात आहे.  या दिशेने सरकार आणि खाजगी क्षेत्र एकत्रितपणे काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली. “एएमएनएस  इंडिया समूहाचा हजीरा प्रकल्प देखील हरित तंत्रज्ञानाच्या वापरावर खूप भर देत आहे, याचा मला आनंद आहे”, असे पंतप्रधान यावेळी  म्हणाले.

भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधान म्हणाले , “जेव्हा प्रत्येकजण पूर्ण शक्तीने ध्येय गाठण्‍याच्या उद्देशाने  प्रयत्न करू लागतो, त्यावेळी ते साध्य करणे कठीण नसते.” पोलाद उद्योगाला नव्या उंचीवर नेण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. “मला खात्री आहे की , हा प्रकल्प संपूर्ण प्रदेशाच्या आणि पोलाद क्षेत्राच्या विकासाला चालना देईल”, असे पंतप्रधान  म्हणाले.