जालना जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त पिकांची कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली पाहणी

बरंजळा लोखंडे, नळणी, वाटुर, एदलापूर भागातील शेतपीकांची पाहणी

जालना, २८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-​ कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज जालना जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे, नळणी गाव परतुर तालुक्यातील वाटुर आणि एदलापूर (ता. जालना) परिसरात शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी सहानुभूतीपूर्वक संवाद साधून त्यांना धीर दिला.

नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून तातडीने शासनास अहवाल सादर करावा, असे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. पंचनामा करीत असताना एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा अभावी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता, धीर धरावा. नुकसानभरपाई बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच निर्णय घेतील, असे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

यावेळी तहसीलदार सारिका कदम, तहसीलदार रूपा चित्रक, जिल्हा परिषद सदस्या आशाताई पांडे, जि. प. सदस्य डॉ. चंद्रकांत साबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे, उपविभागीय कृषी अधिकारी राम रोडगे, भूषण शर्मा, शेख नजीर, मोहन अग्रवाल, तालुका कृषी अधिकारी डॉ. सखाराम पवळ, तालुका कृषी अधिकारी मंठा विष्णू राठोड, तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते, पं. स.तालूका कृषि अधिकारी राजेश तांगडे, गट विकास अधिकारी श्री. सुरडकर , कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि परिसरातील शेतकरी आदींची उपस्थिती होती.