जिल्हा वार्षिक योजनेंतर्गतचा निधी विकास कामांवर वेळेत खर्च करावा – पालकमंत्री अतुल सावे

जालना, २८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-​  जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सन 2022-23 मधील विकास कामांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारे दिरंगाई  करु नये. तातडीने प्रशासकीय मान्यता घेऊन विकास कामांवर  वेळेत निधी खर्च करावा. कुठल्याही परिस्थितीत निधी परत जावु देऊ नये, याची दक्षता सर्व विभागप्रमुखांनी घ्यावी, अशी सूचना पालकमंत्री अतुल सावे यांनी केली. तसेच सन 2021-22 मधील प्रलंबित विकास कामेही मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.  व्यासपीठावर   केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, खासदार  संजय जाधव, आमदार राजेश टोपे, आमदार बबनराव लोणीकर,  आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे,  जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना आदी उपस्थित होते.

पालकमंत्री अतुल सावे म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत चालू वर्षातील कामे पूर्ण करण्यासाठी अवधी कमी राहिला असल्यामुळे  विकास कामांच्या प्रस्तावांना तातडीने तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेण्यात यावी.  पंधरा दिवसांत हे काम पूर्ण करुन कामांना गती द्यावी. लोकप्रतिनिधींच्या सुचनेप्रमाणे सर्व  विभागांनी  प्राधान्याने वेळेत कामे पूर्ण करावीत. कामांमध्ये दिरंगाई करु नये. संपूर्ण निधी विकास कामांवर वेळेत खर्च करण्यात यावा.

अतिवृष्टीमुळे   नुकसान झालेल्या  शेतकऱ्यांना  तात्काळ मदत करता यावी  यासाठी  तातडीने पंचनामे पूर्ण करुन अहवाल  सोमवारपर्यंत  शासनाकडे सादर करावा. जेणेकरुन  मंत्रिमंडळ बैठकीत अहवाल ठेवून त्यावर  निर्णय घेता येईल, अशी सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला केली. जालना जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी  अवैध व गैरप्रकारांना आळा घालण्याकरीता पोलीस यंत्रणेने कडक कारवाई करावी. नगर पालिका प्रशासनाने अतिक्रमणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ती काढावीत. बोगस पीआर कार्डची  चौकशी  करुन संबंधीत  अधिकाऱ्यांवर  कारवाई  करण्याची सूचना  जिल्हा प्रशासनाला त्यांनी दिली.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की,  जिल्हा वार्षिक योजनेतंर्गतचा निधी  वेळेत खर्च करावा. जिल्हयाच्या  विकासाकरीता प्राप्त झालेला हा निधी  परत जाता कामा नये. जिल्हयातील  वेगवेगळया प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यासाठी  पोलीस प्रशासनाने त्या विरोधात कडक भूमिका घ्यावी.  जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी.

खा. संजय जाधव यांनी अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या शेतजमिनींचे अतोनात नुकसान झाले आहे, त्यांचाही पंचनाम्यात समावेश करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. आमदार बबनराव लोणीकर यांनी  जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत  अनुसूचित जाती व आदिवासी  क्षेत्रासाठीचा निधी तातडीने खर्च करण्याची सूचना केली. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी  श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन अभियानातंर्गत निधी  देण्याची मागणीही त्यांनी केली.

आमदार राजेश टोपे यांनी जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत चालू वर्षातील निधी वेळेत खर्च करण्यासाठी  विविध विकास कामांसाठी तात्काळ मान्यता घेऊन कामे गतीने पूर्ण करण्याची सूचना केली. आमदार नारायण कुचे यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना नियमित वीज मिळण्याची मागणी केली. आमदार कैलास गोरंटयाल यांनी जालन्यातील स्टेडियमच्या विकासाबाबत तातडीने कार्यवाही करण्याची सूचना करुन नगरविकासाची कामे त्वरीत मार्गी लावण्याची मागणी केली.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2022-23 अंतर्गत  जालना जिल्हयासाठी 282 कोटी इतका नियतव्यय मंजूर आहे. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 73 कोटी 96 लक्ष इतका नियतव्यय मंजूर आहे. तर ओटीएसपीसाठी 23 कोटी 3 लक्ष 29 हजार इतका नियतव्यय मंजूर आहे.

दरम्यान, जांब समर्थ येथील श्रीराम मंदिरातील मूर्ती चोरी प्रकरणी आरोपींना जेरबंद केल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांचा  पालकमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. पालकमंत्री यांच्यासह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे व लोकप्रतिनिधींनी याप्रसंगी त्यांचे कौतुकही केले.