कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी नागेशवाडी येथील बाधित शेतीची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला

हिंगोली ,२८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-​  कृषिमंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी परभणी वरून हिंगोलीला जात असताना औंढा तालुक्यातील नागेशवाडी येथील साळुबाई माणिकराव नाईक यांच्या शेताच्या बांधावर जाऊन परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी तहसीलदारांना नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले.

यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी साळूबाई माणिकराव नाईक व त्यांचा मुलगा संजय नाईक यांच्यासोबत सहानुभूतीपूर्वक संवाद साधला. तसेच भाऊबीज निमित्त एक भाऊ म्हणून पाच हजार रुपये पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट दिली. तसेच साळूबाई नाईक यांना घरकुल व निराधार योजनेचा लाभ देण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, तहसीलदार कृष्णा कानगुले, तालुका कृषि अधिकारी बबन वाघ, सरपंच प्रकाश घटोले आदींची उपस्थिती होती.