भाजपने अंधेरी पूर्व पोटनिवडणूक लढवू नये; राज ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना पत्र

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत ऋतुजा रमेश लटके यांना बिनविरोध निवडून देण्यात यावे-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार

राज ठाकरेंच्या पत्रावर फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून राज ठाकरेंनी अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून आपला उमेदवार मागे घ्यावा, भाजपने निवडणूक लढवू नये, असे ट्वीट केले आहे.

सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीवर लागले आहे. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, भारतीय जनता पक्षाकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मात्र अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहिले आहे. दिवंगत आमदार रमेश लटके हे आपल्या सर्वांचे सहकारी होते. त्यामुळे सहानुभूतीचा विचार करून भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार या निवडणुकीत देऊ नये अशा आशयाचे पत्र राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.

राज ठाकरेंच्या पत्रावर फडणवीसांची प्रतिक्रिया

राज ठाकरेंनी आवाहन करणारे पत्र लिहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अंधेरी पोटनिवडणुकीत मनसेने आम्हाला पाठिंबा द्यावा, यासाठी आज आशिष शेलार राज ठाकरे यांची भेट घेऊन आले. त्यावेळी अशा पोटनिवडणुकीत आम्ही उमेदवार उभा करत नाही आणि पाठिंबाही देत नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तसेच, त्यांनी आम्हीही उमेदवार न देण्याची विनंती आशिष शेलारांकडे केली. त्यानंतर आता मला पत्र देत त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची विनंती केली आहे.

फडणवीस म्हणाले की, भारतीय जनता पार्टीमध्ये मी एकटा निर्णय करू शकत नाही. राज ठाकरे यांनी दिलेल्या पत्रावर विचार देखील करायचा असेल, तर मला माझ्या सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांची चर्चा करावी लागेल. आम्ही उमेदवार घोषितही केलाय आणि उमेदवारी अर्ज देखील भरला आहे. यापूर्वी अशा काही पोटनिवडणुकांमध्ये आम्हाला योग्य प्रकारे विनंती करण्यात आली तर त्यावेळी आम्ही माघार घेण्याची भूमिका घेतली होती.

पण या स्टेजला आता त्या संदर्भात काही भूमिका घ्यायची असेल तर मला घेता येत नाही. पक्षात या संदर्भात चर्चा करावी लागेल. आमच्यासोबत बाळासाहेबांची शिवसेना आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याशी देखील चर्चा करावी लागेल. जरूर आम्ही या पत्राचा गांभीर्याने विचार करू, मात्र जो निर्णय घ्यायचा आहे, तो चर्चे अंति घेता येईल. असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.

आर आर पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीत आम्ही उमेदवार दिला नव्हता. परंतु, आता शेवटच्या स्टेजला काही भूमिका घ्यायची असेल तर मला एकट्याला निर्णय घेता येणार नाही. त्यासाठी पक्षात चर्चा करावी लागणार आहे. आमच्यासोबत बाळासाहेबांची शिवसेना आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याशी देखील चर्चा करावी लागेल. जरूर आम्ही या पत्राचा सीरियसली विचार करू. मात्र निर्णय जो घ्यायचा आहे तो चर्चे अंती घेता येईल, असं त्यांनी स्पष्ट केले.

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत ऋतुजा रमेश लटके यांना बिनविरोध निवडून देण्यात यावे-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आज मुंबई येथील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी  पत्रकारांशी संवाद साधला. अंधेरी पूर्व पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांनी मांडली.

पवार म्हणाले, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही निवडणूक साधारणतः दीड वर्षांच्या कालावधीसाठी आहे. आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. भाजपाचे श्री. पटेल यांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्या प्रसंगी मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी स्वतः भूमिका घेतली होती की, गोपीनाथ मुंडे यांच्या परिवारातील कोणी उमेदवार उभा राहत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा उमेदवार उभा करणार नाही. तसा निर्णयही घेतला. प्रामाणिकपणे असे वाटते स्व. रमेश लटके यांचे महानगरपालिका आणि विधिमंडळातील योगदान व निवडणूक निवडून येणाऱ्या प्रतिनिधीचा कालावधी पाहता ही निवडणूक बिनविरोध करणे योग्य होईल व महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत ऋतुजा रमेश लटके यांना बिनविरोध निवडून देण्यात यावे असे आवाहन पवार यांनी  केले.