संरक्षण मंत्रालयाचे संलग्न इंक्युबेटर म्हणून मॅजिकची निवड

– इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स (आयडेक्स -iDEX) संस्था करणार संरक्षण  क्षेत्रातील नाविन्यता विकासाकरिता मॅजिकशी करार
– देशातील निवडक इन्क्युबेटरमध्ये मॅजिकचा समावेश

औरंगाबाद,१७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- स्टार्टअप्स इकोसिस्टीम विकसित करण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘मराठवाडा अॅक्सिलरेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्युबेशन कौन्सिल (मॅजिक) या सीएमआयए सदस्यांनी पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या इंक्यूबेटरच्या प्रयत्नांना मोठे यश आले असून, नुकतेच केंद्रीय संरक्षण  मंत्रालयाने डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायजेशन (DIO) माध्यमातून काम करणाऱ्या आयडेक्स (iDEX)  संस्थेचे संलग्न इन्क्युबेटर म्हणून  मॅजिकची निवड करण्यात आली आहे.

भारतातील निवडक इन्क्युबेटरमध्ये मॅजिकचा समावेश झाला असून यामुळे औरंगाबाद आणि मराठवाडा विभागात डिफेन्स क्षेत्राशी निगडीत उद्दोगांना मोठी चालना मिळणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या आयडेक्सचा( iDEX ) मानस संरक्षण क्षेत्रात इकोसिस्टम तयार करण्याचा आहे,  जो संरक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण आणि तंत्रज्ञान विकासाला चालना देईल ज्याचा फायदा बहु-विद्याशाखीय संशोधन आणि विकास (R&D) संस्था,  स्टार्ट-अप आणि नवोन्मेषकांनी घेऊ शकता. हा कार्यक्रम भारतीय सैन्यासाठी स्वयंपूर्णता प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

या बाबत अधिक माहिती सांगताना सीएमआयएचे माजी अध्यक्ष आणि मॅजिकचे संचालक मिलिंद कंक म्हणाले, स्वातंत्र्यानंतर एक राष्ट्र म्हणून भारताचे पहिले उद्दिष्ट संरक्षण आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भरता प्राप्त करणे हे आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा संरक्षण उपकरणे आयात करणारा देश आहे आणि येत्या दशकात आपल्या सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण करण्यासाठी सुमारे  220 अब्ज अमेरिकन डॉलर्स खर्च अपेक्षित आहे. यासाठी इतर देशांवर अवलंबून न राहता आपल्याच देशात उत्पादने विकसित करण्याच्या उद्देशाने डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात आली. इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स -आयडेक्स (iDEX) या संस्थेच्या माध्यमातून नव कल्पना, स्टार्टअप्स आणि एमएसएमई यांना प्रोत्साहन देऊन ही उत्पादने भारतच विकसित करण्याकरिता संलग्न इन्क्युबेटरच्या मदतीने योजना राबविण्यात येत आले. या मध्ये नुकताच मॅजिकचा समावेश करण्यात आला असून, गांधीनगर, गुजरात येथे होणाऱ्या डिफेन्स एक्स्पो दरम्यान करार करण्यात येणार असल्याचे माहिती मिलिंद कंक यांनी दिली. 

संरक्षण  मंत्रालयाने देशात आतापर्यंत 9 मोठ्या इन्क्युबेटर संस्थेसोबत करार केले असून,  आता ‘मराठवाडा अॅक्सिलरेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्युबेशन कौन्सिल’मॅजिक सोबत केआयआयटी बिझनेस इन्क्युबेटर – भुवनेश्वर ओडीसा, बिट्स पिलानी संस्था-राजस्थान, राष्ट्रीय रक्षा युनिवर्सिटी- गुजरात, आयआयआयटी- दिल्ली या देशातील नामांकित संस्थासोबत संरक्षण मंत्रालय करार करणार आहे.

मागील महिन्यात सीएमआयए आणि मॅजिकच्या शिष्ठमंडळाने देशाचे अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांच्या पुढाकारातून रक्षा मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकऱ्यांची भेट घेऊन, औरंगाबादला डिफेन्स इनोव्हेशन हब विकसित करण्याची मागणी केली होती, त्या भेटी दरम्यान या क्षेत्रातील नाविन्यता आणि स्टार्टअप्सआणि एमएसएमईना चालना देण्यासाठी इनोव्हेशन हबच्या माध्यमातून काम करण्याचे आश्वासन संरक्षण मंत्रालयाच्या वतीने देण्यात आले होते. २०१६ पासून सीएमआयए संस्थेच्या माध्यमातून डिफेन्स क्लस्टर विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याची माहिती सीएमआयएचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी दिले. आयडेक्स संलग्न इन्क्युबेटर म्हणून मॅजिकला मिळालेली मान्यता हे औरंगाबाद विभागाला डिफेन्स उप्तादन आणि इनोव्हेशन हब विकसित होण्याच्या दृष्टीने  टाकलेले हे पहिले पाऊल असेल असे नितीन गुप्ता नमूद केले.

संयुक्तपणे राबविण्यात येणारे प्रकल्प या कराराअंतर्गत संरक्षण मंत्रालय मॅजिकच्या माध्यमातून भारतीय सशस्त्र दलांसोबत नाविन्यपूर्ण संरक्षण तंत्रज्ञान तयार करू शकतात अश्या स्टार्टअप्स/एमएसएमईना प्रोत्साहन देऊन त्यांना मार्गदर्शन करणे. निवडण्यात आलेल्या स्टार्टअप्स/एमएसएमईंना समर्थन देण्यासाठी इनक्युबेशन सपोर्ट आणि प्रवेगकसारखे कार्यक्रम चालविणे. शाळा आणि महाविद्यालयीन स्तरावर संरक्षण नवकल्पनांना प्रोत्साहन देणे,  प्रोटोटाइपिंग आणि प्रायोगिक संरक्षण संबंधित उत्पादने/तंत्रज्ञानासह ओळखल्या गेलेल्या स्टार्टअप्स/एमएसएमईंना प्रोत्साहन देणे. भारतीय संरक्षण आस्थापनेशी संवाद साधण्यासाठी स्टार्टअपसाठी इकोसिस्टम तयार करण्यासाठी आयडेक्ससोबत संयुक्तपणे प्रकल्प राबविणे इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहे.