प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा, शहिदांना अभिवादन

पुणे, दि. १४ : कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा (रक्तद्रव) उपचार पद्धती यशस्वी ठरत असल्याने अधिकाधिक व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

प्लाझ्मा दाते आणि प्लाझ्मा स्वीकृते यांच्या मध्ये समन्वय यासाठी मितेश घट्टे, पोलिस उपायुक्त, विशेष शाखा प्रयत्न करत आहे. यासाठी http://puneplasma.in हे ॲप विकसित करण्यात आले आहे. शासकीय निर्णय आणि कायदेशीर बाबी लक्षात घेऊन यामध्ये समन्वय साधला जात आहे. ॲपवर प्लाझ्मा दान करण्यासाठी ३३ जणांनी इच्छा प्रदर्शित करून नोंदणी केली आहे तर ६१ जणांनी प्लाझ्माची मागणी केली आहे. प्लाझ्मा दात्यांच्या कुटुंबातील सदस्याला भविष्यात प्लाझ्माची गरज भासल्यास त्यांना प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे प्लाझ्मा दात्यांनी कोणतीही शंका मनात न ठेवता पुढे यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

मुंबई, दि. १४ : भारतीय स्वातंत्र्याच्या ७३व्या वर्धापनदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या असून स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या शहीद वीरांना अभिवादन केलं आहे. असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रतिज्ञाबद्ध होऊया, कोरोनाचं संकट आजवरचं सर्वात मोठं संकट असून पुढचे काही महिने प्रतिबंधक नियमांचे पालन करुन आपण सर्वांनी कोरोनामुक्तीचा लढा एकजुटीनं लढूया, कोरोनाला हरवूया, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार स्वातंत्र्यदिनानिमित्तच्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, स्वातंत्र्यदिन हा आपल्यासाठी सर्वात मोठा राष्ट्रीय सण असूनही कोरोनामुळे तो मर्यादित उपस्थितीत, साधेपणानं साजरा करावा लागत आहे याची खंत सर्वांच्या मनात आहे. असं असलं तरी सामाजिक जाणीव, राष्ट्रीय कर्तव्यं व जबाबदारीच्या भावनेतून आपल्याला हे करायचे आहे. कोरोनाचा प्रसार रोखणं, देशवासियांचे प्राण वाचवणं, याला सर्वोच्च प्राधान्य असल्याने सर्व देशवासियांनी स्वत:चा, कुटुंबाचा, इतरांचाही कोरोनापासून बचाव करुन कोरोनामुक्तीच्या लढ्यात योगदान द्यावं. ही आजच्या घडीची सर्वात मोठी देशसेवा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी देशवासियांना कोरोनामुक्तीच्या लढ्यास सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.

देशाचं स्वातंत्र्य, एकता, अखंडता, सार्वभौमता, लोकशाही मुल्ये अबाधित राखणं ही आपली जबाबदारी आहे. ती पार पाडण्यासाठी आजवर अनेक सुपुत्रांनी सर्वोच्च त्याग केला. अमूल्य योगदान दिलं. त्या सर्वांबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आघाडीवर राहून पहिल्या फळीत लढत असलेले डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, अंगणावाडी ताई, आशाताई, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज संस्थांचे अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते या सर्वांचं, राज्यभरातील लोकप्रतिनिधींचेही उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत. राज्यातील जनतेनेही कोरोनाविरुद्धच्या लढ्यात नियम व संयम पाळून मोठा त्याग केला आहे. सक्रीय योगदान दिलं आहे. आपलं योगदान महाराष्ट्र विसरणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेलाही धन्यवाद दिले आहेत.

देशाचं स्वातंत्र्य, सार्वभौमत्वं, लोकशाही मुल्यांच्या रक्षणासाठी आपण सर्वांनी एकजूट होऊन देशाला समृद्ध, बलशाली देश बनवण्याचा निर्धार करुया, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या संदेशात केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *