वैजापुरात प्रलंबित कर्ज प्रकारणांसंदर्भात बँक अधिकाऱ्यांची आढावा बैठक ; तक्रारींचा पाऊस

आ. बोरणारे यांच्या उपस्थितीत पीक कर्ज व शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी चर्चा 

वैजापूर,८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- प्रलंबित कर्ज प्रकरणे, कर्जमाफी व शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी  वैजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात बोलाविण्यात आलेल्या बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत अक्षरशः तक्रारींचा पाऊस पडला. कर्जप्रकरणाच्या संचिका अधिकाऱ्यांकडून दाखविण्यात येणारा ठेंगा,  अरेरावीची भाषा, प्रलंबित प्रकरणांबाबत वादळी चर्चा बैठकीत झाली. या बैठकीत एकाही बँक अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही.

या बैठकीस आमदार रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, राज्याचे माजी उद्योग संचालक जे.के. जाधव, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब पाटील जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. तालुक्यातील शेतकरी व बेरोजगारांना विविध शासकीय योजनेतर्गंत कर्ज मिळवण्यासाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागतात. यासंदर्भात अनेकांनी वेळोवेळी केंद्रीय वित्तराज्यमंत्री भागवत कराड यांच्याकडेही तक्रारी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता.7) आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्या प्रमुख उपस्थितीत बँक अधिकारी व नागरिकांची उपविभागीय कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. तालुक्यातील बहुतांश बँकेत मोठ्या प्रमाणात प्रलंबित पीककर्ज, आण्णाभाऊ विकास महामंडळ व मुद्रा कर्जाबाबत आमदार बोरनारे यांच्यासह उपविभागीय अधिकारी आहेर यांनी बँक अधिकाऱ्यांना विचारणा केली. मात्र यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. यामुळे 17 ऑक्टोबरला  उपविभागीय अधिकारी कार्यालयात पुन्हा एकदा बँक अधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याचे  माणिक आहेर यांनी यावेळी सांगितले. बैठकीस येतांना बँक अधिकाऱ्यांनी मुद्रा कर्ज, पीककर्ज,आण्णाभाऊ विकास महामंडळातर्गंत वाटप करण्यात आलेल्या कर्जाची आकडेवारी, ग्राहक संख्या, कर्जासंबंधी बँकेत प्रलंबित संचिकांच्या माहितीसह  बँक अधिकाऱ्यांनी हजर राहण्याचे फर्मान सोडले आहे. याशिवाय नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेले प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये अनुदान तात्काळ मिळावे. यासाठी नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी लकवरात-लवकर तयार करा. अशा सूचना देखील आ.बोरणारे यांनी बँक अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. याशिवाय बाबासाहेब जगताप यांनीही बँकेत येणाऱ्या ग्राहकांना किमान अपेक्षीत वागणूक द्या, दोन-दोन वर्षे कर्जाच्या संचिका साठवूण ठेवू नका,आवश्यक कागदपत्र जमा करताना ग्राहकांची होणारी दमछाक व त्यानंतर बँकेचे हेलपाटे यातून नागरिकांची सुटका करा. अशा सूचना अधिकाऱ्यांना यावेळी केल्या. 

आमदारांनी अधिकाऱ्यांचे टोचले कान

दरम्यान या बैठकीत एका शेतकऱ्याने बँक अधिकाऱ्याकडून ‘आज आओ , कल आओ, परसो आओ, नेटवर्क नही हैं’ अशा पद्धतीने वर्षभरापासून त्रास सुरू असल्याचे सांगितले. याची दखल घेत आमदार बोरनारे यांनी संबंधित अधिकाऱ्याला ‘ आपण कुठले?’ अशी विचारणा केली असता त्यांनी ‘बिहार’ असे उत्तर दिले. त्यांच्या प्रत्युत्तरानंतर बोरनारे यांनी ‘साहब ये हमारे महाराष्ट्र के किसान हैं, इन लोगों को आप परेशान मत किजिए, किसानो के सभी प्रलंबित कामो को तुरंत निपटारा किजीए’ असे संबंधित अधिकाऱ्याला सांगितले.