‘समाज बदलण्यासाठी चित्रपट हे उपयुक्त माध्यम’  – डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन 

विद्यापीठात चित्रपट आस्वाद शिबिराचा समारोप 

नांदेड ,७ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :- चित्रपट हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. आपले विचार सर्वदूर पोहचण्यासाठी या माध्यमाचा योग्य वापर करता येऊ शकतो. समाज बदलण्यासाठी चित्रपटांचा उपयोग करता येतो, त्यासाठी अभ्यासकांनी पुढे यावे. असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी केले. 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या चित्रपट आस्वाद लघु अभ्यासक्रमाचा समारोप आज झाला. यावेळी डॉ. बिसेन अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. मुख्य अतिथी म्हणून सुप्रसिद्ध माध्यमतज्ञ पंकज सक्सेना यांची उपस्थिती होती. तर विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, ललित कला संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे समन्वयक डॉ. पी. विठ्ठल व्यासपीठावर उपस्थित होते. ‘आजादी का अमृत महोत्सव’ या अंतर्गत सुरू असलेल्या चित्रपट आस्वाद अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र वितरण प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. 

चित्रपट आस्वाद अभ्यासक्रम चित्रपट पाहण्याची नवी दृष्टी प्रदान करतो. चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नसतात याची जाणीव यामुळे होते. असे पंकज सक्सेना म्हणाले.  समारंभास प्रशिक्षणार्थी, विद्यार्थी व चित्रपट अभ्यासक उपस्थित होते. डॉ. राजू मोतेवार यांच्या ‘कादंबरी आस्वाद आणि आकलन’ या ग्रंथाचे प्रकाशन यावेळी डॉ. बिसेन यांच्या हस्ते झाले. महेश चिंतनपल्ले यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पृथ्वीराज तौर यांनी व सूत्रसंचालन डॉ. अनुराधा जोशी पत्की यांनी  केले. शेवटी प्रा. राहूल गायकवाड यांनी आभार मानले.