लोकसंख्या नियंत्रण ही काळाची गरज-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत

“गांव गांव में सज्जन शक्ति, रोम रोम में भारत भक्ति l
यही विजय का महास्तंभ है, दसों दिशा से करे प्रयाण l
जय जय मेरे देश महान ll भारत माता की जय!”

असा संदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प्रमुख मोहन भागवत यांनी भारताच्या जनतेसाठी दिला आहे. नागपुरातील रेशम बागेत विजयादशमीनिमित्त दसरा मेळाव्याला संबोधित करताना मोहन भागवतांनी महिला स्वातंत्र्य आणि समानतेपासून लोकसंख्या नियंत्रणापर्यंतच्या अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. जगात आता भारताचे ऐकले जात आहे. आपल्या देशाचे जगात वजन वाढत आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे भागवत म्हणाले. संघाच्या विजयादशमीच्या मेळाव्यात सरसंघचालक काय सांगतात? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते. संघाचा राष्ट्रनिष्ठा आणि देशप्रेम याचा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीच्याही कानावर आहे. देशात मोदी सरकार सत्तेवर आहे. गेल्या आठ वर्षांत केंद्र सरकारच्या माध्यमातून जागतिक पातळीवर जे भरीव कार्य झाले आहे, त्यातून आज देशाची प्रतिमा जगात उंचावली आहे, तोच धागा भागवत यांनी पकडला. श्रीलंकेच्या संकटात भारताने खूप मदत केली. युक्रेन-रशिया युद्धादरम्यान घेतलेल्या भूमिकेबद्दल अभिमान वाटतो, असे भागवत म्हणाले. यानिमित्ताने केलेल्या भाषणातून भागवतांनी १० प्रमुख मुद्द्यांवर भर दिला, त्याकडे बारकाईने पाहणे गरजे आहे.

क्रीडा क्षेत्रातील धोरणांमध्येही चांगली सुधारणा झाली असून आमचे खेळाडू ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकत आहेत. कोरोनानंतर देशाची अर्थव्यवस्थाही सुधारत आहे. काळानुसार सगळे काही बदलत आहे. आपल्या देशात कलह, अराजकता, दहशतवाद वाढत आहे. त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. सर्व क्षेत्रांत आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल सुरू राहावी यासाठी सरकारकडून निश्चित धोरणात्मक पावले उचलली जात आहेत. जगभरात भारताचे महत्त्व आणि विश्वासार्हता वाढली आहे. कोरोनासारख्या आपत्ती काळातून बाहेर पडून आता आपली अर्थव्यवस्थाही पूर्वपदावर येत आहे. आत्मनिर्भरतेच्या वाटचालीत आपल्याला आपल्या देशाचे आत्मस्वरूप, शासन, प्रशासन व समाज या सर्वांची नेमकी ओळख असायलाच हवी. या वाटचालीत प्रसंगानुरूप लवचिक भूमिका घ्यावी लागते. तरच परस्पर सामंजस्य आणि विश्वासाच्या भावनेने आगेकूच सुरू राहते, असे भागवत यांनी सांगितले.

संघाच्या कार्यक्रमांमध्ये समाजातील विचारवंत आणि कर्तृत्ववान महिलांच्या उपस्थितीची परंपरा जुनीच आहे. मातृशक्तीला देवतास्थानी बसवून तिची पूजा करणे किंवा तिला दुय्यम दर्जा देऊन स्वयंपाकघरातच बंदिस्त करून ठेवण्याऐवजी, प्रबोधन, महिलांचे सशक्तीकरण आणि समाजक्षेत्राशी संबंधित सर्व कार्यांत महिलांना बरोबरीचे स्थान देण्यावर भर दिला पाहिजे. लोकसंख्या नियंत्रणासोबतच धार्मिक आधारावर लोकसंख्या संतुलन हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याकड दुर्लक्ष करता येणार नाही. जेव्हा जेव्हा एखाद्या देशात लोकसंख्येचा असमतोल असतो, तेव्हा त्या देशाच्या भौगोलिक सीमाही बदलतात. जन्मदरातील असमानतेबरोबरच हाव, लोभ, जबरदस्ती धर्मांतर आणि देशात होणारी घुसखोरी ही प्रमुख कारणे आहेत. जितकी लोकसंख्या जास्त तितका बोजा जास्त हे खरं आहे. लोकसंख्येचा योग्य वापर केला, तर ते संसाधन बनतं. आपला देश ५० वर्षांनंतर किती लोकांना अन्न आणि आधार देऊ शकेल, याचाही विचार केला पाहिजे. त्यामुळे लोकसंख्येचे सर्वसमावेशक धोरण बनवून ते सर्वांना समानतेने लागू केले पाहिजे. स्वतंत्र भारतातही स्वार्थ आणि द्वेषाच्या आधारे समाजातील विविध घटकांमध्ये अंतर आणि वैर निर्माण करण्याचे काम सुरू आहे. त्यांची भाषा, पंथ, प्रांत, नीती कोणतीही असो, त्यांच्या भानगडीत न पडता त्यांच्याशी (कट्टरवादी) निर्दयीपणे वागून त्यांचा विरोध केला पाहिजे.

समाजाने कणखर भूमिका घेतली नाही, तर कोणतेही काम किंवा परिवर्तन यशस्वी व शाश्वत होत नाही, हा सार्वत्रिक अनुभव आहे. कोणतीही व्यवस्था कितीही चांगली असली, तरी लोकांना अनुकूल केल्याखेरीज किंवा लोकांनी स्वीकारल्याखेरीज ती टिकू शकत नाही. प्राचीन काळापासून सुजल, सुफल, निर्मळ, शीतल असलेली ही भारतमाता निसर्गतः सुरक्षित अशा आपल्या चतु:सीमांमध्ये आपणा सर्वांना सुरक्षित व निश्चिंत ठेवते. या अखंड मातृभूमीची अनन्य भक्ती हाच आमच्या राष्ट्रीयत्वाचा मुख्य आधार आहे. भागवत जे बोलतात ती संघांची भूमिका आहे. त्यामुळे पुढील वर्षी संघाच्या स्थापनेला शंभर वर्षं होत असताना, संघाची दिशा काय? हे भागवतांच्या भाषणातून अधोरेखित झाले आहे.