‘हम आपके है कौन’चे संगीतकार राम लक्ष्मण यांचे निधन 

नागपूर  ,२२ मे /प्रतिनिधी :-

ख्यातनाम संगीतकार राम लक्ष्मण जोडीमधील लक्ष्मण यांचे नागपूर येथे निधन झाले. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. अखेर शुक्रवारी मध्यरात्री एक वाजता त्यांची प्राणज्योत मावळली.ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शोभा पाटील, मुलगा संगीतकार अमर पाटील, सूना, नातवंडे, दोन मुली असा आप्त परिवार आहे.

राम कदम उपाख्य राम व विजय पाटील उपाख्य लक्ष्मण अशी राम-लक्ष्मण ही जोडी होती. राजश्री फिल्मसच्या ‘एजंट विनोद’ हा या जोडीचा पहिला चित्रपट. १९७६ साली आपले जोडीदार राम यांच्या मृत्यू नंतरही लक्ष्मण यांनी राम-लक्ष्मण याच नावाने संगीत दिले. मराठीत दादा कोंडके यांच्या चित्रपटांचे संगीतकार म्हणून ते खूप गाजले. आजपर्यत त्यांनी सुमारे ७५ हिंदी, मराठी व भाेजपुरी चित्रपटांना संगीत दिले आहे.

लक्ष्मण यांचे खरे नाव विजय काशीनाथ पाटील. वयाची विशी ओलांडल्यावर विजय पाटील नागपूरहून घर सोडून मुंबईला आले. मुंबईत आल्यानंतर त्यांची ओळख सुरेंद्र हेंद्रेंशी झाली. ते बासरी वाजवत. एका कार्यक्रमात दादा कोंडके यांनी विजय पाटील आणि सुरेंद्र हेंद्रे या दोघांना आपल्या पुढच्या सिनेमाला संगीत देण्याची ऑफर दिली. विजय पाटील यांना घरात लखन म्हणत. तेवढेच दादांनी लक्षात ठेवले आणि या जोडगोळीचे नामकरण राम-लक्ष्मण असे करून टाकले. नंतर किडनीच्या आजाराने सुरेंद्र हेंद्रे यांचे निधन झाले. याच काळात ‘एजंट विनोद’चे काम मिळाले. पण हेंद्रेंच्या अनुपस्थितीत नुसत्या लक्ष्मण नावाने संगीत देणे विजय पाटील यांना बरोबर वाटेना. आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी बॉलिवूडच्या मोहमयी दुनियेत प्रवेश तर मिळवलाच, पण स्वत:चा स्वतंत्र ठसाही उमटवला. विजय पाटील म्हणून नाही तर संगीतकार राम लक्ष्मण म्हणून. त्यानंतर त्यांनी याच नावाने अनेक सिनेमांना संगीत दिले आणि ते सिनेमे यशस्वी ही झाले होते. राम लक्ष्मण यांच्या नावावर एक-दोन नाही तर तब्बल ९२ चित्रपट आहेत. मराठीतच नाही तर हिंदीतही त्यांनी एकाहून एक सरस, सुपरहिट गाणी दिली.

‘पांडू हवालदार’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘राम राम गंगाराम’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘आली अंगावर’ असे एकाहून एक धमाल सिनेमे आणि त्यातील अफाट गाणी. हीच परिस्थिती ‘राजश्री प्रॉडक्शन’च्याही बाबतीत. ‘राजश्री’चा सिनेमा म्हटला की राम लक्ष्मण यांचे संगीत हे समीकरण नुसते रुढच झाले नाही तर यशस्वीही झाले. १९७६ मध्ये त्याची सुरुवात झाली आणि ‘साँच को आँच नहीं’, ‘तराना’, ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’ या सिनेमांना त्यांनी संगीत दिले. संगीत क्षेत्रामध्ये दिलेल्या भरीव योगदानाबद्दल राम लक्ष्मण यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यामध्ये ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या नावाने दिल्या जाणा-या पुरस्काराचाही समावेश आहे.

हिंदीत ‘हम से बढकर कौन’, ‘सुन सजना’, ‘दिवाना तेरे नाम का’, ‘पोलिस पब्लिक’, ‘हंड्रेड डेज’, ‘दिल की बाजी’ ‘पत्थर के फुल’ आदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. इथपर्यत उषा मंगेशकर यांच्याकडून त्यांनी गाणी गाऊन घेतली.१९८९ च्या ‘मैने प्यार किया’ या सलमान माधुरी दीक्षित अभिनीत चित्रपटाने त्यांना अमाप यश आणि नाव दिले. यासाठी त्यांना फिल्म फेअर पारितोषिक मिळाले. त्या नंतरचे ‘हम आप के है कौन’ व ‘हम साथ साथ है’ हे चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजले.

लक्ष्मण उपाख्य विजय पाटील यांची सुरूवात नागपुरातील गाजलेल्या कादर आॅर्केस्ट्रातून झाली. एम. ए. कादर हे त्यांचे बालमित्र. बाबा स्वामी, एम. ए. कादर व विजय पाटील हे तिघे आॅर्केस्ट्रात गायचे. काही वर्षांनी ते मुंबईला निघून गेले. त्यांच्या जाण्याने एक हृदयस्थ मित्र गमावला, अशी शोकसंवेदना कादर यांनी व्यक्त केली. एकदा झालेली मैत्री ते शेवटपर्यत जपत. त्यांनीच मला अंतिम न्याय व फौज या चित्रपटात पार्श्वगायनाची संधी दिली. कादर संगीत अकादमीचे उद्घाटन आम्ही त्यांच्या हस्ते केले होते, अशी आठवण कादर यांनी सांगितली.