वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाची चौकशी करा, दूध का दूध पानी का पानी होईल – अजितदादा पवार

मुंबई ​,२० सप्टेंबर  /प्रतिनिधी :- वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावर अनेकदा चर्चा झाली आहे. या प्रकल्पातून राज्यातील तरुण बेरोजगांरामध्ये प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वस्व पणाला लावून तो प्रकल्प पुन्हा राज्यात आणावा, अशी अपेक्षा विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील पक्ष कार्यालयात अजितदादांनी विविध विषयांवर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.

Image

पुढे ते म्हणाले, या प्रकल्पाबद्दल ज्यांना वास्तविक माहिती नाही. त्यांनी महाविकास आघाडी सरकारबद्दल जनतेत संभ्रमावस्था निर्माण करण्याचे काम केले आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारने राज्यात मोठमोठे प्रकल्प यावे यासाठी प्रयत्न केले. काहीजण उगाच बेरोजगार तरुणांमध्ये अफवा पसरवत आहेत. आमच्या सरकारमुळे प्रकल्प हातातून गेला असा आरोप साफ खोटा आहे. त्यांच्या हातात सरकार आहे, यंत्रणा आहेत. त्यांनी तपास यंत्रणांच्या माध्यमांतून चौकशी करावी म्हणजे दूध का दूध पानी का पानी होईल, असे अजितदादांनी सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतले. अजितदादा पुढे म्हणाले की, राज्याच्या हिताचे जे प्रकल्प असतील ते प्रकल्प महाराष्ट्रात यावेत, परंतु यातून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची खबरदारी राज्य सरकारने घ्यावी.

ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला अधिक जागा

ग्रामपंचायत निवडणुका पक्षीय चिन्हावर होत नाहीत. माध्यमांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महाविकास आघाडीला या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये अधिक जागा मिळाल्या आहेत हे चित्र समोर आले, असे अजितदादा म्हणाले. ग्रामपंचायत निवडणूक ही निवडणुकांची रंगीत तालीम आहे. आगामी काळात पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका, महानगरपालिका होतील. ग्रामपंचायतींमध्ये विजयी झालेल्या सर्वांना शुभेच्छा देत प्रत्येकाने लोकहिताची कामे करावीत, अशी अपेक्षाही अजितदादांनी व्यक्त केली.

निधी किती मिळाला हे न पाहता एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत व्हावे

महाविकास आघाडी सत्तेत असताना एसटी महामंडळाला १४०० कोटींची तरतूद पहिल्या अर्थसंकल्पात केली होती. एसटीच्या उत्पन्नातून सगळे पगार होतील अशी परिस्थिती राहिलेली नाही. आम्ही सत्तेत असताना हा कमी पडणारा निधी राज्य सरकार आपल्या तिजोरीतून देईल असा विश्वास दिला होता. एसटी महामंडळाला कोणता निधी कमी पडला की जास्त झाला हे न पाहता खरतरं एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत व्हावे याबद्दल सरकारने बारकाईने लक्ष द्यावे, अशी मागणी अजितदादांनी राज्य सरकारकडे केली आहे.

निंदकाचे घर असावे शेजारी, कोणाला काय निंदा करायची ते करू द्या.

निंदकाचे घर असावे शेजारी. त्यांना काय निंदा करायची ती करू द्या. आम्हाला काही फरक पडत नाही, असा टोला अजितदादांनी लगावला. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केलेल्या टिप्पणीवर अजितदादा यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले.

राष्ट्रीय नेत्यांकडून आम्हाला लोकांमध्ये राहून काम करण्याची शिकवण आहे. जनतेला जे योग्य वाटेल, त्यांच्या पाठिशी जनता उभी राहील. एकेकाळी दोन खासदार असलेला पक्षही वर जाऊ शकतो हे निंदकांनी लक्षात घ्यावे, असे अजितदादा म्हणाले.

आपल्या देशात महागाई, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था यांसारखे महत्त्वाचे प्रश्न आहेत. परंतु हे प्रश्न बाजूला ठेवून दुसरेच प्रश्न पुढे आणले जातात. देशात चित्त्यांची संख्या वाढावी हे मान्य आहे, मात्र यातून रोजगारीचा प्रश्न सुटणार नाही. त्याऐवजी वेदांताचे काय होणार ते सांगावे, तरुणांच्या हाताला रोजगार कधी मिळणार ते सांगावे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या कामाला नेहमीच पाठिंबा देण्याचे काम करेल, असे अजितदादा यांनी स्पष्ट सांगितले.