नागमठाण – चेंडूफळ रस्त्याचे काम रात्रीच्या अंधारात ; निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याची बाजाठाण येथील ग्रामस्थांची तक्रार

वैजापूर,१५ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील नागमठाण ते चेंडुफळ या रस्त्याचे काम ठेकेदार रात्री अंधारात करीत असून हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार बाजाठाण चे माजी सरपंच सुभाष पाटील भराडे व ग्रामस्थांनी केली आहे. 

नागमठाण – चेंडूफळ रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे केले जात आहे. सहा महिन्यांपूर्वी या रस्त्याच्या कामासाठी 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. श्री.क्षेत्र सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्याहस्ते व आ.रमेश पाटील बोरणारे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे यांच्या उपस्थितीत भूमीपूजन झाले होते.

नागमठाण – चेंडूफळ या रस्त्यावरील बाजाठाण गांवामध्ये रात्रीच्या वेळी रस्त्याचे काम सुरू असल्याचे दिसून आले. ठेकेदार पालेजा हे या रस्त्याचे काम करीत असून संबंधित कामावरील अभियंता याकडे येऊन सुध्दा पाहत नाही. रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून या संदर्भात तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामावर येऊन समक्ष पाहणी करावी अशी मागणी बाजाठाणचे माजी सरपंच सुभाष पाटील भराडे यांनी केली आहे.