पालिका निवडणूकीत भाजपला आस्मान दाखवू : उद्धव ठाकरे

मुंबई ,६ सप्टेंबर /प्रतिनिधी :-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी मुंबई दौरा केला. त्या दौऱ्यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आपल्याला धोका देणाऱ्या उद्धव ठाकरेंना जमीन दाखवण्याची वेळ आता आली आहे अशी घोषणा अमित शाह यांनी केली होती. भाजपच्या या आव्हानाला उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरेही आता पुढे सरसावले असून त्यांनी आता पालिका निवडणुकीत भाजपला आस्मान दाखवू अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे. निववडणुकीसाठी आम्ही तयार आहोत आणि आता आमच्या बरोबरचे लोक हे कट्टर निष्ठावान शिवसैनिक आहेत असा दावाही ठाकरेंनी केला आहे.
 आता संघर्षाची वेळ आहे आणि याच काळात खरे निष्ठावंत कळून येतात. सत्तेसाठी जे हपापले होते ते निघून गेले आहेत आणि आता जे बरोबर आहेत ते आमचे खरे निष्ठावंत आहेत. शिवाजी महाराजांनी जसे मूठभर मावळ्यांच्या साथीने बलाढ्य मुघलांना अनेकदा धूळ चारली होती, तसेच आम्ही करू, आमच्या या मूठभर निष्ठावंतांच्या साथीने आम्ही भाजपला धूळ चारू असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला आहे. आपल्या मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या निर्णयाचे समर्थनही केले मला सत्तेची हाव नव्हती त्याचमुळे एका क्षणात मी सगळे सोडून बाहेर पडलो असा दावाही ठाकरेंनी केला आहे.

उद्धव ठाकरेंकडून सातत्याने भाजपवर टीका केली जातेय की भाजपने शिवसेनेत फूट पाडली आणि मराठी माणसाला बदनाम कारण्याचा त्यांचा हा डाव आहे. मात्र अमित शाह यांनी आपल्या मुंबई दौऱ्यात उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला. शिवसेनेतील फुटीला उद्धव ठाकरेच कसे जबाबदार आहेत हे त्यांनी दाखवून दिले आणि उद्धव ठाकरेंचा खोटेपणा उघडकीस आणला. यासर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आता हा शिवसेना भाजप संग्राम पुढे रंगतच जाणार असेच आता दिसत आहे.