गृहमंत्र्यांकडून दरमहा १०० कोटींच्या खंडणी वसुलीचे टार्गेट : परमबीर सिंह

मुंबई, दि. २० :मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटींची मागणी केली, असा गंभीर आरोप त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात केले आहे.अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट सचिन वाझे यांना दिले होते, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिले आहे. जवळ जवळ आठ पानाचे हे पत्र आहे. त्यात त्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. वाझेंना खात्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर मंत्र्यांनी काय काय टार्गेट दिले होते आणि कोणी कोणी वाझेंना काय काय सांगितले होते याची सर्व धक्कादायक माहिती या पत्रात देण्यात आली आहे.

पत्रात नेमके काय ?

भारताचा खरा नागरिक म्हणून मी मागील ३२ वर्षे पोलीस अधिकारी म्हणून घेतलेल्या शपथेला जागलो आहे. मी खाली नमूद केलेल्या मुद्द्यांची आपण दखल घ्यावी ही विनंती. तसेच तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदाच्या संवैधानिक जबाबदाऱ्यांच्या पाठिशी उभे राहा. आयपीएस परमबीरसिंह म्हणतात, मार्चच्या मध्यावर वर्षा बंगल्यावर मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो. तिथं अँटीलियाच्या केसबद्दल पूर्ण माहिती देत होतो. त्यावेळेसच मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कामाबद्दलही तुमच्या कानावर घातले. एव्हढंच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देशमुखांच्या चुकीच्या कृतीची माहिती दिली. तिथं उपस्थित असलेल्या इतर मंत्र्यांना खरं तर ही माहिती आधीच होती असं माझ्या लक्षात आलं.

सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करायला सांगितलं. फेब्रुवारीच्या मध्यावर वाझेंना शासकीय निवासस्थानावर बोलवून गृहमंत्री देशमुखांनी ही सूचना केली. त्यावेळेस देशमुखांचे पर्सनल सेक्रेटरी पलांडे हेही हजर होते. एक दोन घरातले स्टाफ मेंबरही हजर होते. एवढच नाही तर शंभर कोटी रुपये गोळा करण्यासाठी काय करायचं हेही देशमुखांनी सांगितलं. त्यात देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत १७५० बार आणि रेस्टॉरंट आहेत, आणि त्यातल्या प्रत्येकाकडून दोन ते तीन लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला चाळीस ते पन्नास कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर सोर्सेकडून जमा करता येईल.

त्यानंतर वाझे हे त्याच दिवशी माझ्या ऑफिसला आले. आणि मला देशमुखांनी केलेल्या मागणीबद्दल सांगितलं. मला त्याचा धक्का बसला. खरं तर मी ही परिस्थिती कशी हाताळायची याचा विचार करत होतो. काही दिवंसापूर्वी सोशल सेवा विभागाचे एसीपी संजय पाटील यांना अनिल देशमुख यांनी त्यांच्या मुंबईतील शासकीय निवास्थानी बोलवून हुक्का पार्लर विषयी चर्चा केली. त्याबैठकीला इतर अधिकारी आणि अनिल देशमुख यांचे पीए पलांदे उपस्थित होते. दोन दिवसांनंतर पाटील आणि डीसीपी भुजबळ यांना अनिल देशमुख यांच्या निवास्थानी बैठकीसाठी बोलवण्यात आले. पाटील आणि भुजबळ यांना अनिल देशमुख यांच्या घराबाहेर थांबवण्यात आलं. त्यावे्ळी पलांदे आत होते. पलांदे यांनी अनिल देशमुख यांच्या केबिनमधून बाहेर आल्यानंतर मुंबईतील ४०-५० कोटी रुपये १७५० बार,हॉटेल मधून जमा होतील, असं पलांदे म्हणाले. संजय पाटील यांनी मला ती माहिती दिली, असं परमबीर सिंह यांनी पत्रात म्हटलं आहे.
देशमुख यांचा भ्रष्ट कारभार पोलीस दलातील अनेक अधिकाऱ्यांच्या नजेत आला होता. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.११ व्या मुद्द्यात त्यांनी अनेक गंभीर बाबी स्पष्ट केल्या आहे. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा कऱण्यासाठी टार्गेट द्यायचे. त्या टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते.

मात्र मुकेश अंबानी प्रकरणी तसंच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना आणि त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना, परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

प्रकाश आंबेडकर : राज्य सरकार बरखास्त करा, हे सरकार म्हणजे चोरांचं सरकार. २२ मार्चला आम्ही राज्यपालांना भेटून महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याबाबत निवेदन देणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे.

राज ठाकरे : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी.

रामदास आठवले : महाराष्ट्र सरकार कुचकामी ठरलेलं आहे, सचिन वाझे हे शिवसेनेच्या जवळ आहेत, त्यामुळे आता महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लावण्याची वेळ आलेली आहे, अशी प्रतिक्रिया रिपाइं नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी दिली आहे.

विद्या चव्हाण : परमबीर सिंहांचे आरोप हास्यास्पद आहेत, त्यांनी केलेले आरोप म्हणजे केंद्र सरकारचा बेबनाव आहे, असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केला आहे. 

गौरव भाटिया : महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर वसुलीचा आरोप होत असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही बोलत का नाहीत, असा सवाल भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी विचारला आहे. महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार लोकशाहीला घातक होत चाललं आहे, असंही भाटिया म्हणाले आहेत. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी आता राष्ट्रीय स्तरावरूनही होत आहे. 

प्रवीण दरेकर : घडलेल्या प्रकारामुळे महाराष्ट्र सरकारची अब्रू वेशीला टांगली आहे. गृहमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा आणि देशमुख यांनी वाझेंना वसुलीचं काम दिलं होतं का हे महाविकास आघाडी सरकारने स्पष्ट करावं, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस : परमबीर सिंहांच्या आरोपांमुळे हे सिद्ध होतंय, की पोलिसांचं कशाप्रकारे खच्चीकरण होत आहे. त्यामुळे गृहमंत्री आपल्या पदावर राहू शकत नाही, मुख्यमंत्र्यांनी देशमुखांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. याप्रकरणाची निष्प:क्ष चौकशी व्हावी, अशी मागणीही फडणवीसांनी केली आहे.

परम बीर सिंग यांच्या स्वाक्षरी नसलेल्या ईमेल पत्राबाबत शहानिशा

मुंबई, दि. २० : गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परम बीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत ईमेलवर आज दुपारी 4.37 वाजता पत्र प्राप्त झाले आहे. [email protected] या ईमेल पत्त्यावरून परम बीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे, त्याचप्रमाणे परम बीर सिंग यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

वास्तविक पाहता परम बीर सिंग यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ईमेल पत्ता [email protected] असा आहे त्यामुळे आज प्राप्त झालेला ईमेल तपासून घेणे आवश्यक आहे असे मुख्यमंत्री कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात येते.