सोमय्या हल्ला प्रकरणी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरांसह चार नगरसेवकांना अटक व सुटका

मुंबई,२५ एप्रिल /प्रतिनिधी :- भाजप नेते किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेना नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह चार नगरसेवकांना खार पोलिसांनी अटक केली व थोड्यावेळाने जामिनावर सोडून दिले. यामध्ये विश्वनाथ महाडेश्वर, हाजी खान, चंद्रशेखर वायंगणकर आणि दिनेश कुबल यांना अटक केले होते.

किरीट सोमय्या यांनी वांद्रे पोलिसांकडे हल्लाप्रकरणाचा जबाब नोंदवला होता. त्यानुसार वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. अधिकच्या तपासासाठी हा गुन्हा खार पोलिसांकडे वर्ग केला होता. खार पोलिस ठाण्याच्या अगदी गेटवर सोमय्यांवर हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या मागील सूत्रधार कोण, हे शोधण्यासाठी पोलिसांवर मोठा दबाव होता. अखेर सोमय्या यांच्या हल्ला प्रकरणात महाडेश्वर यांच्यासह तीन नगरसेवकांना खार पोलिसांनी अटक केली.

राणा दाम्पत्याची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या २३ एप्रिलला खार पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी पोलीस ठाण्यामधून परत जात असताना किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांच्या गाडीवर दगड, बाटल्या आणि चपला फेकल्या. यामध्ये किरीट सोमय्यांच्या गाडीची काच देखील फुटली आणि किरीट सोमय्या या हल्ल्यात जखमी झाले.

त्यावेळी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे देखील तेथे उपस्थित होते. सोमय्यांच्या वाहनचालकाने शिवसैनिकांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महाडेश्वर यांनी केला आहे. या संदर्भात सोमय्या यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी महाडेश्वर पोलिस स्थानकात गेले होते.