शिंदे सरकारचे खाते वाटप अखेर जाहीर ; अजित पवार यांच्यावर सोपवली अर्थ आणि नियोजन खात्याची जबाबदारी

मुंबई,१४ जुलै /प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काही आमदारांसोबत बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यावेळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली याला बरेच दिवस उलटले तरी अद्याप खातेवाटप झालं नव्हतं. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते काही खात्यांवर अडून बसले असल्याने हे खातेवाटप रखडलं होतं असं बोललं जात होतं. अनेकांचं लक्ष या खातेवाटपाकडे लागलं होतं. आता ही प्रतिक्षा मिटली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमधील खातेवाटप जाहीर झालं आहे.या खातेवाटपात भाजपच्या मंत्र्यांकडे असणारी ६ आणि शिवसेना शिंदे गटाकडे असलेली ३ खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील मंत्र्यांना मिळाली आहेत.

अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून खातेवाटपाची चर्चा सुरु होती. काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांमध्ये मॅरेथॉन बैठका झाल्या होत्या. पण या मॅरेथॉन बैठकांमधील निष्फळ ठरली होती. अखेर दिल्लीवारी करुन आल्यानंतर खातेवाटपाचा तिढा सुटला आहे.

अजित पवार यांच्यासह आठ मंत्र्यांना खाते वाटप झालं आहे. तर काहींच्या खात्यात फेरबदल देखील करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि नियोजन खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर दिलीप वसळेपाटील यांच्याकडे सहकार खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कृषी विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालय देण्यात आलं आहे. हसन मुश्रीफ हे या मंत्रीमंडळात वैद्यकीय शिक्षण खात्याची जबाबदारी पाहणार आहेत. तर धर्मराव बाबा अत्राण यांच्यावर अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संजय बनसोडे यांच्याकडे क्रीडा मंत्रालय तर अनिल भाईदास पाटील यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय देण्यात आलं आहे. शिंदे फडणवीस सरकारमधील एकमेव महिला मंत्री असलेल्या आदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालविकास मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या आधी कृषी मंत्रालय सांभाळणारे अब्दुल सत्तार यांच्याकडे आता अल्पसंख्यांक विकास व औकफ, पणन हे खात असणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर

राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्येदेखील काही फेरबदल करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले  विभाग

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.

इतर २६ मंत्र्यांची खाती  पुढीलप्रमाणे :

छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार

राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास

सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य

चंद्रकांतदादा बच्चू पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास

गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन

गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता

दादाजी दगडू भुसे – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण

धनंजय पंडितराव मुंडे – कृषि

सुरेश दगडू खाडे- कामगार

संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय रविंद्र सामंत- उद्योग

प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण

रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),

अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन

दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व  मराठी भाषा

धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन

अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क

कु. आदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास

संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे

मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता

अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.