प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींच्या निधनाबद्दल विधानपरिषदेत श्रद्धांजली

विधानसभेत हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली

नागपूर ,३० डिसेंबर/ प्रतिनिधी :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन दामोदरदास मोदी यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल विधानपरिषदेत शोकप्रस्तावाद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली.

हिराबेन मोदी यांच्या दुःखद निधनाबद्दल उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शोक प्रस्ताव मांडला व आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर सभागृहात दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली

नागपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री दिवंगत हिराबेन दामोदरदास मोदी यांना आज विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. सभागृहाच्यावतीने अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी शोकसंदेश वाचून दाखविला.

शोकसंदेशात ॲड. नार्वेकर म्हणाले, हिराबेन मोदी यांनी नुकतीच आपल्या वयाची शंभर वर्ष पूर्ण केली होती. प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आईंचा मोठा प्रभाव आहे. त्यांनी तसे एका मुलाखतीत बोलून दाखविले होते. आपल्या आईने जीवनात अनेक कष्ट केले असल्याचा उल्लेख श्री. मोदी यांनी केला आहे. प्रधानमंत्री निवासस्थानी त्या केवळ एकदाच गेल्या होत्या. नोटाबंदीच्या आपल्या मुलाच्या निर्णयाच्या समर्थनार्थ  त्या एटीएमच्या रांगेतही उभ्या राहिल्या होत्या.

त्यांचे जीवन ही एक सर्वसामान्य कुटुंबाची कथा आहे. त्यांच्या बालवयातील संघर्षाचे स्मरण औचित्यपूर्ण ठरेल. त्यांनी नरेंद्र मोदी यांना ‘काम करो बुद्धीसे और जीवन जीयो शुद्धी से’ असा जीवन संदेश दिला होता, असे श्री. नार्वेकर यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

सभागृहाच्या वतीने दिवंगत हिराबेन दामोदरदास मोदी यांच्या निधनाबद्दल स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. शोकप्रस्तावाची एक प्रत शोकाकुल कुटुंबाला पाठविण्यात आली आहे.