नवनीत राणा जरा तोंड सांभाळून……कोण आहात आपण ? शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांनी नवनीत राणा याना फटकारले

हनुमानाने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली : नवनीत राणा

मुंबई ,६ सप्टेंबर /प्रतिनिधी :- मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा सर्वनाश होणार, असे वक्तव्य करून स्वतःला किरकोळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नवनीत राणांचा शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
नवनीत राणा जरा तोंड सांभाळून……
कोण आहात आपण “सी”‘ ग्रेड फिल्म मध्ये काम करणाऱ्या एक अभिनेत्या…. एक आमदार आपल्यावर भाळला आणि राजकारणात आपला चंचू प्रवेश झाला….
काय संबंध आपला हनुमान चालीसा शी….. हनुमानाला हनुमान का म्हणतात? याचं साधं उत्तर मुलाखती मध्ये आपल्याला देता आलं नाही… म्हणे मी हनुमान भक्त…. भाजपाच्या सी …..डी टीम म्हणून काम करणाऱ्या मनसेने भोंग्यांच्या विषयासाठी मशिदीसमोर हनुमान चालीसा वाचा म्हणून सांगितलं…. तुम्ही डायरेक्ट मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचायला निघालात…… ज्या बाईला लाखो शिवसेनिकांचे श्रद्धास्थान असलेलं मातोश्री या मंदिरातला आणि मशिदीतला फरक कळत नाही त्या बाईला आणखी कशी वागणूक मिळायला पाहिजे होती. तुम्ही म्हणाल शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आघाडी केली वगैरे वगैरे….. म्हणून मातोश्री आणि मातोश्री चे विचार हिंदुत्ववादी राहिले नाहीत…. बाळासाहेबांचे राहिले नाहीत….. पण याच मातोश्रीवर माननीय बाळासाहेबांनी मुस्लिम कुटुंबीयांना त्यांची नमाजाची वेळ झाल्यानंतर नमाज अदा करण्याची विनंती केली होती आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत नमाज अदा केला देखील…. हे तुमच्यासारख्या “मुंबईची मुलगी’ म्हणून घेणाऱ्या बाईला माहिती पाहिजे. ही मुंबईची मुलगी कदाचित त्यावेळी” C” ग्रेड फिल्म करण्यात बिझी होती. आणि आता फड उभा करून कमळाबाईची सुपारी वाजवते….. हे महाराष्ट्र आणि मुंबईला पक्के कळाले आहे.
कावळीणीच्या शापाने गाय मरत नसते बाई..! त्यामुळे माझ्या शापामुळे माझ्यावर झालेल्या अन्यायामुळे शिवसेनेला कार्यकर्ता उरला नाही अशा फाजील वल्गना करून थेर महाराष्ट्राला दाखवू नका… शिवसेना ही कालही मजबूत होती आजही मजबूत आहे आणि तुमच्यासारख्या 100 दुश्मनांच्या छाताडावर उभी राहून पुन्हा एकदा या मुंबई महाराष्ट्रावर आपला भगवा डौलाने फडकत ठेवणार आहे….. कितीही शूर्पणखा अंगावर आल्या तरी त्यांची नाक कापून….
असे शिवसेना उपनेता व प्रवक्ता संजना घाडी म्हणाल्या.

हनुमानाने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली : नवनीत राणा

जळगाव : खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. जेलमध्ये सुध्दा हनुमान चालीसा पठण केली, यावेळी हनुमानाला म्हटले होते की, माझी भक्ती खरी असेल तर उध्दव ठाकरेंना त्यांची जागा दाखव आणि आज हनुमानाने उध्दव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली. आता घरात उभे राहायला सुध्दा कार्यकर्ता उरला नाही असे म्हणत नवनीत राणा यांनी उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

जळगावमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आम्हाला तुरुंगामध्ये टाकणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्याकडे आता सतरंजी उचलायला ही कार्यकर्ता शिल्लक नाही, अशी टीका राणा दाम्पत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.जळगाव शहरातील महाराणा प्रताप गणेश मंडळात खासदार नवनीत राणा व त्यांचे पती रवी राणा दाम्पत्याचा हनुमान चाळीसा पठणाचा कार्यक्रम झाला. यापूर्वी राणा दाम्पत्यांनी मंडळाच्या बाप्पाचे दर्शन घेत आरती केली. त्यानंतर हनुमान चाळीसा पठण केले.