ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंना मारहाण करणा-या ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाची पक्षातून हकालपट्टी

बीड ,१९ मे  / प्रतिनिधी :- ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंना दोन चापटा मारल्याचा दावा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केला होता. तसा त्यांनी व्हिडीओ देखील बनवला होता. मात्र त्यानंतर सुषमा अंधारेंना मारहाण केल्याचा दावा करणाऱ्या आप्पासाहेब जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

पक्षविरोधी कारवाया केल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच सुषमा अंधारे यांनी देखील शिंदे गटाची ही स्क्रिप्ट असल्याचा आरोप केला आहे. विशेश म्हणजे या जिल्हाप्रमुखाने सुषमा अंधारे दादागिरी करत पैसे मागतात म्हणून आपण त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला होता.

जाधव यांनी एका व्हिडीओमध्ये सांगितले आहे की, ‘बीडमध्ये ठाकरे गटाच्या प्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत देखील उपस्थित राहणार आहेत. शनिवारी ही सभा होणार आहे. या सभेची पाहणी करण्यासाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह उपनेत्या सुषमा अंधारे देखील तेथे आल्या होत्या. त्या सध्या जिल्ह्यात दादागिरी करत आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांकडे पैसे मागत आहेत. एसी, सोफ्यासाठी हे पैसे त्या मागत आहेत.’

त्या माझे पदही विकायला लागल्या आहेत. मी पक्ष वाढीसाठी अत्यंत प्रयत्न करत आहे. मी पक्ष वाढीसाठी रात्र अन् दिवस मेहनत करत आहे, रक्ताचं पाणी करत आहे, हाडाची काडं करत आहे. माझ्या लेका-बाळाच्या मुखातील पैसे खर्च करुन पक्ष वाढवत आहे. पण त्यावर त्यांचं लक्ष नाही. यातूनच सुषमाताई अंधारे आणि माझ्यात बाचाबाची झाली. याच वादातून मी त्यांना दोन चापटा मारल्या, अशी कबुली बीडमध्ये ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी दिली.

दरम्यान, सुषमा अंधारे यांनी ही शिंदे गटाची स्क्रिप्ट असल्याचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या, मी सुखरुप आहे. पण घटनाक्रम सांगणे गरजेचे आहे. बीड शहरातील माने कॉम्प्लेक्समध्ये २० मे रोजी आपली सभा होणार आहे. यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी सभेच्या ठिकाणी पाहणीसाठी गेलो होतो. यावेळी सभेच्या स्टेजची पाहणी करताना ठाकरे गटाचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्यात कुठल्यातरी कारणावरून शिवीगाळ आणि धक्काबुक्कीचा प्रकार घडला. आप्पासाहेबांची भाषा उर्मट आणि अत्यंत खालच्या पातळीवरील होती. त्यानंतर जाधव तेथून निघून गेले.

मात्र जाधव यांनी केलेले सर्व आरोप खोटे असून, यात्रेला गालबोट लागावे म्हणून शिंदे गटाने ही स्क्रिप्ट रचली आहे. तसेच आप्पासाहेब जाधव हे निष्क्रिय कार्यकर्ते आहेत. तसेच त्यांना या अगोदरच्या सभेला लोकांची गर्दी जमवता आली नव्हती. मात्र मी एक महिला असूनही एक प्रबोधन यात्रा यशस्वी करून दाखवली याची सल त्यांना असेल. आता त्यांना काय उत्तर द्यायचं या उद्विगणतेतून त्यांनी मला मारहाण झाल्याचा दावा केला असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या.