एसटीच्‍या शहर बस मधील महिला वाहकाला शिवीगाळ :तरुणाला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि पाच हजार रुपयांच्‍या दंड

औरंगाबाद,​२​ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- रद्द झालेला पास परत करा म्हणत एसटीच्‍या शहर बस मधील महिला वाहकाला शिवीगाळ करुन अरेरावी करणाऱ्या तरुणाला कार्ट उठेपर्यंत शिक्षा आणि विविध कलामांखाली पाच हजार रुपयांच्‍या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्‍यायाधीश व्‍ही.एस. कुलकर्णी यांनी शुक्रवारी दि.२ सप्‍टेंबर रोजी ठोठावली. ओमप्रकाश सुदाम नवसागरे (रा. रांजणगाव ता. गंगापुर) असे आरोपी तरुणाचे नाव आहे.

या प्रकरणात वैशाली सुरेश पाटील (३१, रा. ठाकरेनगर, एन-२ सिडको) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, ३ सप्‍टेंबर २०१२ रोजी फिर्यादी या सकाळी ६.१० ते १२.३५ वाजेच्‍या सुमारास सिडको ते रांजणगाव एसटीच्‍या शहर बसवर (क्रं. एमएच-१४-बीटी-१९००) वाहक म्हणुन कर्तव्‍यावर होत्‍या. बस सकाळी ६.१० वाजता सिडको येथुन प्रवासी घेवून रांजणगाव येथे गेली. ६.५५ वाजता रांजणगाव येथून प्रवासी घेवून बस सिडको बस स्‍थानकाच्‍या दिशेने निघाली होती. फिर्यादी या बस मधील प्रवशांना तिकिट देत असतांना आरोपीन ओमप्रकाश नवसागरे याने बस पास फिर्यादी यांना दिला. मात्र महिन्‍याभरापूर्वीच संपला होता. ही बाब फिर्यादीने आरोपीला सांगितली व तिकीट काढण्‍याचे सांगितले. आरोपीने तिकीट काढले, मात्र संपलेला पास परत करण्‍याची मागणी फिर्यादीकडे केली. त्‍यावर फिर्यादीने हा पास कन्‍ट्रोलरकडे जमा करते, नंतर तु तो पास त्‍यांच्‍याकडून घेवून असे सांगितले. मात्र चिडलेल्या आरोपीने फिर्यादीला अरेरावी करुन शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीच्‍या हातातील तिकिट देण्‍याचे ई मशिन ओढले, त्‍यामुळे मशीन जमीनीवर आदळून बंद पडले. या प्रकरणात क्रांतीचौक पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता.

गुन्‍ह्यात तपास अधिकारी तत्कालीन सहायक निरीक्षक वैशाली एमपुरे यांनी न्‍यायालयात दोषारोपपत्र न्‍यायालयात सादर केले. खटल्याच्‍या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता उल्हास पवार यांनी ५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपी ओमप्रकाश नवसागरे याला दोषी ठरवून भादंवी कलम ३५३ अन्‍वये कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि ती हजार रुपये दंड, कलम ४२७ अन्‍वये कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणुन सहायक फौजदार सुरे यांनी काम पाहिले.