स्वत:च्या मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करून न देणार्‍यांना शिक्षणाचे महत्व काय कळणार!

आमदार सतीश चव्हाण यांची आमदार बंब यांच्यावर टीका 

औरंगाबाद,१ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळेमधील शिक्षक मुख्यालयी वास्तव्यास राहत नसल्याचे सांगत त्यांच्यावर रोष व्यक्त केला होता. आज त्यांनी शिक्षक व पदवीधर आमदार या शिक्षकांना पाठीशी घालतात त्यामुळे शिक्षक व पदवीधर मतदारसंघच बंद केले पाहिजे अशी बातमी एका वृत्त वाहिनीवर पाहिली.आमदार बंब यांच्या मागणीचा राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी चांगलाच समाचार घेतला.

          सतीश चव्हाण म्हणाले, खरे तर आ.प्रशांत बंब यांची मागणी अत्यंत हास्यास्पद आहे. जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत शिक्षकांनी त्यांच्या मुख्यालयी वास्तव्य राहिले पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र मुख्यालयी राहण्यासाठी त्या शिक्षकांना राहण्या योग्य घरे, सोयीसुविधा आहेत का? याचा विचार आमदार महोदयांनी करायला हवा. शिक्षक हे वेळेवर शाळेत येत असतील व विद्यार्थ्यांना ते गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असतील तर आमदार महोदयांचा शिक्षकांना मुख्यालयी राहण्याचा एवढा अट्टहास कशासाठी? अनेक शिक्षकांना कौटुंबीक अडचणीमुळे मु‘यालयी राहणे शक्य होत नाही याचा देखील आमदार महोदयांनी विचार केला पाहिजे. शिक्षकांनी मुख्यालयी राहण्यापेक्षा आमदार प्रशांत बंब यांनी त्यांच्या मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक सोयीसुविधा, इमारतींच्या झालेल्या दैयनीय अवस्थेसंदर्भात सभागृहात आवाज उठवला असता तर निदान हा प्रश्न मार्गी लागण्यास नक्कीच मदत झाली असती.

          सतीश चव्हाण म्हणाले, खरे तर विद्यादानाचे पवित्र काम करणार्‍या शिक्षकांवर फक्त विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम नाही तर सरकार त्यांच्याकडून इतरही कामे करून घेतेच ना! कोरोना काळात डॉक्टर, पोलीस यांच्याबरोबरच शिक्षकांनी देखील स्वत:चा जीव धोक्यात घालून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली हे कादाचित आमदार महोदय विसरले असावेत. त्यामुळे आमदार महोदयांनी पहिल्यांदा आपल्या सरकारला शिक्षकांवर लादलेली अध्यापन बाह्य कामे पूर्णत: बंद करायला सांगावीत, जिल्हा परिषद शाळांना पूर्ण पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास भाग पाडावे आणि मग शैक्षणिक गुणवत्तेबद्दल गप्पा झोडाव्यात.

          आमदार महोदयांना माझी विनंती आहे की, त्यांनी एखाद्या खाजगी संस्थेकडून सर्वे करून घ्यावा की, जि.प.च्या शाळेत शिकलेले विद्यार्थी आज कुठे आहेत. समाजातल्या सर्वच क्षेत्रात जि.प.शाळेत शिकलेले विद्यार्थी अग्रेसर दिसतील. आणि ते मोठ्या अभिमानाने ही गोष्ट सांगतात असे आमदार सतीश चव्हाण​ यांनी सांगितले. ​

          आता तर आ.प्रशांत बंब यांना शिक्षक, पदवीधर मतदारसंघ कालबाह्य वाटायला लागले आहेत. उद्या वरिष्ठ सभागृह असणारे विधान परिषद ही नको वाटेल. त्यामुळे अशा ‘उथळरावांनी’ शिक्षक व पदवीधर आमदारांवर बोलण्यापेक्षा आपल्या मतदारसंघाचा विकास कसा होईल याकडे लक्ष द्यावे. शिक्षक, पदवीधरांचे प्रश्न मांडायला आम्ही समर्थ आहोत…! असे आमदार सतीश चव्हाण​ यांनी सांगितले. ​