राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणूक प्रक्रिया स्थगित; निवडणूक आयोगाचा निर्णय

मुंबई : राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मध्ये केलेल्या दुरूस्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाकडून आज स्थगित करण्यात आली आहे.

महापालिकेतील सदस्य संख्येतील बदल करणारा आणि आरक्षणाची प्रक्रिया रद्द करणारा निर्णय काल शिंदे फडणवीस सरकारने घेतला होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णय शिंदे सरकारने बदलला असून त्यावर निर्णय घेत राज्य निवडणूक आयोगाने तातडीने निर्णय घेत या सर्व निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील २५ जिल्हा परिषदेची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली असून राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भातील परिपत्रक काढून माहिती दिली आहे.

राज्यातील २५ जिल्हा परिषदा आणि २८४ पंचायत समित्यांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना आज जाहीर करण्यात येणार होती. पण निवडणूक आयोगाने निर्णय घेत जिल्हा परिषदांमधील जाहीर करण्यात येणार असलेली मतदार यादीची प्रक्रियाही स्थगित करण्यात आली असल्याचे राज्य निवडणूक आयोगाच्या परिपत्रकात म्हटले आहे. त्याचबरोबर यासंदर्भातील सूचना सदर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.