निवडणूक प्रक्रियेच्या यशस्वीतेत प्रत्येकाची भूमिका महत्त्वपूर्ण – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद, दिनांक 11 : पदवीधर मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा आणि त्यातील प्रत्येकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्यादृष्टीने सर्वांनी आपल्याला सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. त्यासाठी निवडणूक प्रशिक्षणाचा योग्य उपयोग करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकार मराठवाडा विद्यापीठ येथे निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. चव्हाण मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री. चव्हाण म्हणाले, निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक गोष्ट व्यवस्थितरित्या वेळेत, नियमाप्रमाणे होणे हे बंधनकारक आहे. प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत घ्यावयाची खबरदारी, यासोबतच मतदान करताना निर्माण होणारे संभाव्य प्रश्न, समस्या याबाबत परिपूर्ण माहिती या निवडणूक प्रशिक्षणाव्दारे सर्वांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.

या मतदान प्रक्रियेत ईव्हीएमचा वापर केल्या जात नाही. तर लोखंडी मतपेट्यांचा वापर केल्या जातो. मतदार आपल्या पसंती क्रमानुसार मतपेटीव्दारे मतदान करतात. त्यादृष्टीने आवश्यक असलेल्या सर्व बाबी, पूरक साहीत्य, त्याचा वापर, मतदान केंद्रावर घ्यावयाच्या आवश्यक नोंदी या सर्व बाबी गतिमानतेने, अचूकपणे पार पाडण्याची जबाबदारी मतदान केंद्रातील अधिकारी, कर्मचारी यांची आहे. त्यासाठी सर्व प्रक्रिया व्यवस्थित समजून घेत आपल्याला दिलेले काम अधिक चांगल्या प्रकारे पार पाडण्याच्या भूमिकेतून सर्वांनी या प्रशिक्षण कार्यक्रमांचा उपयोग करून घ्यावा, असे सूचीत करून श्री. चव्हाण यांनी विभागात सर्वाधिक मतदान केंद्र औरंगबादला असून 206 मतदान केंद्रावर 98257 मतदार आपला मतदानाचा हक्क येत्या दि. 1 डिसेंबर रोजी बजावणार आहेत. त्यादृष्टीने सर्व संबंधितांनी सज्ज रहावे.

तसेच कोवीड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत असल्याने आरोग्यविषयक सुरक्षा नियम पालन करत आपल्याला ही प्रक्रिया यशस्वी करावयाची आहे, असे सांगून श्री. चव्हाण यांनी प्रशासनामार्फत निवडणूक विषयक कामकाजातील अधिकारी, कर्मचारी यांच्या सुरक्षेची काळजी घेतल्या जाणार असल्याचे सांगितले. तसेच सर्व मतदान केंद्रावर मास्क वापर, सॅनिटायजर, सामाजिक अंतराचे पालन या नियमांचे पालन कटाक्षाने करावयाचे आहे. त्याचप्रमाणे मतदानाच्या दिवशी देखील मतदान केंद्रावर सर्व पथकांमध्ये एक आरोग्य सेवक असणार आहे. कोवीड बाधीत मतदारांचे मतदान हे शेवटच्या दोन तासात करावयाचे आहे. सर्व मतदान केंद्रावर आयोगातर्फे निवडणूक निरीक्षक असणार आहेत. त्याचप्रमाणे प्रशासन सर्वतोपरी ही मतदान प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मतदान केंद्रावर सर्व आवश्यक बाबी, सुविधांची पूर्तता ठेवणार आहे. तरी निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकारी, कर्मचारी यांनी संघ भावनेतून परस्पर समन्वय आणि एकत्रिक प्रयत्नातून ही संपूर्ण प्रक्रिया यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी सर्व प्रशिक्षणार्थीना मतदानाच्या दिवशी पार पाडावयाच्या जबाबदारीबाबत तसेच संभाव्य अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने विस्तृत मार्गदर्शन यावेळी पीपीटीव्दारे केले. सर्व संबंधित अधिकारी, प्रशिक्षणार्थी यावेळी उपस्थित होते.औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली असून दि. 1 डिसेंबर 2020 रोजी त्यासाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन प्रशासना मार्फत करण्यात येत आहे.