पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंची लंडनमध्ये १००० कोटींची मालमत्ता असल्याचा सीबीआयचा दावा

पुणे ,२९ जुलै /प्रतिनिधी :- पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांनी घोटाळ्याच्या पैशातून मालमत्ता खरेदी केल्याचा सीबीआयच्या आरोपपत्रातून दावा करण्यात आला आहे. त्यांची लंडनमधील १००० कोटींची मालमत्ताही आता वादात सापडली आहे. तीन दिवसांपूर्वी सीबीआयने अविनाश भोसलेंविरोधात आरोपपत्र दाखल केले त्यातून ही माहीती समोर आली आहे. अविनाश भोसले यांना डीएचएफएल आणि येस बँक घोटाळाप्रकरणी सीबीआयने २६ मे रोजी पुण्यातून अटक केली होती. त्यानंतर त्यांना दहा दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

लंडनमधील फाईस ट्रॅक ही अलिशान आणि ऐतिहासिक वारसा असलेली इमारत २०१८ मध्ये भोसलेंनी खरेदी केली होती. या इमारतीत दोनशे खोल्यांच्या हॉटेलमध्ये रुपांतर करण्याचा त्यांचा मनोदय होता. बर्मिंगहम पॅलेसजवळ ही मालमत्ता होती त्यामुळे भारतीय उद्योजकाने ही इमारत खरेदी केल्यानंतर मोठी चर्चाही झाली होती.

या हॉटेलसाठी एक हजार कोटी रुपयांपैकी सातशे कोटी रुपये कर्ज स्वरुपात भोसलेंनी एस बॅंकेकडून घेतले. त्याचाच तपास सीबीआय करीत आहेत. या कर्जात अनियमितता आहे. केवळ कन्सलटन्सी फी म्हणून सत्तर कोटी दिले गेले. तसेच रेडीयस ग्रूप आणि डीएचएफएलकडून एकूण सहाशे कोटी रुपये जमवले होते त्यात स्वतः तीनशे कोटींची रक्कम भरत इमारत खरेदीसाठी व्यवहार केला होता.

हा व्यवहार सीबीआयच्या रडारवर आहे. या व्यवहारांचा तपशिल काय होता याचाच तपास सीबीआय करीत आहे. सध्या अविनाश भोसले न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची परत सीबीआय कोठडी घेतली जाऊ शकते आणि परत चौकशी केली जाऊ शकते.

सीबीआयने डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी अविनाश भोसलेंवर ही कारवाई केली. भोसले यांचे नाव येस बँक घोटाळाप्रकरणीही चर्चेत होते. या दोन्ही प्रकरणांची सीबीआयने चौकशी सुरू केली होती. शिवाय याप्रकरणी पुणे – मुंबई परिसरातील तब्बल ८ ठिकाणी छापेमारी केली होती. या छाप्यातून सीबीआयच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागल्याचे समजते. त्यातूनच ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने याआधी अविनाश भोसले यांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.