निधी वाटपात कोणता ही पक्षपात केलेला नाही : अजित पवार

मुंबई: विधानपरिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे आपल्या ४० समर्थक आमदारांसकट आधी गुजरातच्या सुरतमध्ये त्यानंतर आसामच्या गुवाहाटीमध्ये गेले आहेत. या मुळे महाविकास आघाडी सरकार अल्प मतात आल्याची चर्चा आहे. गेल्या अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळात निधी वाटपात कोणता ही पक्षपात केलेला नाही असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. गुरवारी संध्याकाळी अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत हा मुद्दा मांडला.
महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आहे, आणि आमचा उद्धव ठाकरेंना पाठींबा आहे असे अजित दादा म्हणाले. गुरुवारी दि. २३ रोजी संध्याकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित दादा बोलत होते. तसेच या सरकारच्या कार्यकाळात निधी वाटपात कोणता ही पक्षपात केलेला नाही. स्थानिक पातळीवरचे प्रश्न वेगेळे असू शकतात, परंतु दुजाभाव नाही असे अजित दादा म्हणाले. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात आणि राज्याच्या बाहेर नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहेत. सध्या गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू या पंच तारांकित हॉटेलमध्ये तब्बल ४६हून अधिक एकनाथ शिंदे समर्थक आमदार आहेत. तर शिवसेनेतील एकूण पंधरा आमदार उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत. २२ जून २०२२ रोजी फेसबुक लाईव्ह नंतर उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगल्यामधून आपला मुक्काम पुन्हा मातोश्री येथे हलवला आहे. मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला सोडल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमदारांच्या नाराजीमुळे अडचणीत आलेले महाविकास आघाडी सरकार टिकणार कि कोसळणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.