चोरी केलेल्या ट्रकचे बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी तिघांना बेड्या

औरंगाबाद,२५ जुलै /प्रतिनिधी :-नांदेड येथील एका व्‍यक्तीकडून ३१ लाखात खरेदी केलेल्या ट्रकचा हप्‍ता देणे होत नसल्याने साथीदारांच्‍या मदतीने ट्रक चोरी करुन ट्रकचा चेसीस व इंजिन क्रमांकामध्‍ये बदल करुन ट्रकचे बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी तिघांना  गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने सोमवारी दि.२५ पहाटे बेड्या ठोकल्या.शेकनाथ यादव पवार (४२, रा. सौभाग्य चौक हडको), गोकुाळ भिवसन जाधव (२५, रा. मारोतीनगर, मयुर पार्क) आणि नासेर खान दौलतखान पठाण (४७, रा. घनसावंगी जि. जालना, ह.मु. पटेल कॉलनी, चिकलठाणा) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींना २८ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.व्‍ही. चरडे यांनी दिले.

या प्रकरणात फिर्यादी तथा आरोपी ज्ञानेश्‍वर भिवसन जाधव (३०, रा. मारोतीनगर, मयुर पार्क) याने फिर्याद दिली होती. ज्ञानेश्‍वरने १६ मार्च २०२० मध्‍ये नांदेड येथे राहणार्या गायकवाड यांच्‍याकडून ट्रक (क्रं. एमएच-२६-बीई-२७४०) ३१ लाख ३० हजार रुपयांना खरेदी केला होता. ट्रकच्‍या खरेदी पोटी दोन लाख ६० हजार रुपये ज्ञानेश्‍वरने गायकवाड यांना दिले होते. तर उर्वरित रक्कम ६७ हजार ९६० रुपये हप्‍त्याप्रमाणे देण्‍याचे ठरले होते. दरम्यान १६ ते २० डिसेंबर २०२१ दरम्यान ज्ञानेश्‍वरने ट्रक बीड बायपास रोडवरील बंबाटनगराच्‍या कमानीच्‍या पूर्व दिशेला रोडच्‍या खाली उभा केला असता चोरट्यांनी तो लंपास केला. प्रकरणात पुंडलिकनगर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

गुन्‍ह्याचा तपास सुरु असताना गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने तिघा आरोपींना अटक केली. त्‍यांची चौकशी केली असता फिर्यादी तथा आरोपी ज्ञानेश्‍वर, माजीद मणीयार यांच्‍यासोबत कट रचून ट्रक चोरी केला, तसेच ट्रकचा चेसीस व इंजिन क्रमांकामध्‍ये बदल करुन ट्रकचे बनावट कागदपत्र तयार केले. त्‍यानंतर तो ट्रक नागपुर आरटीओ कार्यालयातून आरोपी नासेर खान याच्‍या नावे करण्‍यात आला, अशी कबुली आरोपींनी दिली.

आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील जरीना दुरार्णी यांनी गुन्‍ह्यातील पसार आरोपींना अटक करायची आहेत. नागपुर आरटीओ कार्यालयात ट्रक नासेर खान याच्‍या नावे करण्‍यासाठी कोणी मदत केली याचा तपास करायचा आहे. आरोपींनी ट्रकचा चेसीस आणि इंग्जिन नंबर कोठुन व कोणाकडून बदलून घेतला. आरोपींनी अशा प्रकारे आणखी किती गुन्‍हे केले याचा तपास बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.