कृषि उडान योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी; उत्पादित शेतमाल देश-विदेशात पोहोचविण्याचे नियोजन करावे : केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार

कृषि उडान योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी; उत्पादित शेतमाल देश-विदेशात पोहोचविण्याचे नियोजन करावे : केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार

नाशिक,२० जुलै /प्रतिनिधी :- ‘कृषि उडान योजना 2.0’ ची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात उत्पादित होणारा शेतमाल देश-विदेशात पोहोचविण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालय व कृषि विभागासह इतर सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने नियोजन करावे, अशा सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज कृषि उडान योजनेबाबत झालेल्या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री डॉ.पवार या दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून बोलत होत्या. या बैठकीस जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, कृषि उपसंचालक कैलास निकम, आत्माचे प्रकल्प संचालक आर.एस. निकम हे प्रत्यक्ष उपस्थित होते. तर नवी दिल्ली नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे सचिव राजीव बन्‍सल, पुणे कृषि आयुक्तालयाचे संचालक डॉ. के.पी. मोते, पणन महामंडळाचे चंद्रशेखर बारी, जिल्हा पणन अधिकारी बी. पी देशमुख, नाशिक एअरपोर्ट कार्गो वाहतूकचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बंजन, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, सह्याद्री फार्मा प्रोड्युसर कंपनीचे विलास शिंदे दुरदृष्यप्राणालीद्वारे उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या की, आपल्या जिल्ह्यात कृषि व अकृषी स्वरूपाच्या हंगामी उत्पादित होणाऱ्या शेतमालास देशात व विदेशात चांगली मागणी आहे.

यासाठी जिल्ह्यातील शेतकरी, शेतीमाल उत्पादक कंपन्यांना कृषि उडान योजनेबाबत मार्गदर्शन करून या योजनेचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे. याकरिता वेळोवेळी या योजनेशी संबंधित विभाग, शेतकरी व शेतमाल उत्पादक कंपन्यांच्या समवेत बैठकीचे आयोजन करावे, असे निर्देशही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी जिल्हा प्रशासनास दिले आहेत.

नाशिक जिल्हा कृषि उत्पादनात अग्रेसर असल्याने कृषि उडान योजनेच्या माध्यमातून हवाई मार्गाद्वारे शेतमालास जागतिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या सहकार्याने कृषि विभाग व जिल्ह्यातील शेतमाल उत्पादक कंपन्यांनी एकत्रितपणे मागणी असलेल्या प्रदेशात व देशात उत्पादन निर्यातीसाठी हवाई मार्ग निश्चित करावेत. जेणेकरून जिल्ह्यात उत्पादित झालेला दर्जेदार व ताजा शेतमाल वेळेत हवाई मार्गाने आवश्यक स्थळी पोहोचविणे शक्य होईल, असेही केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी बैठकीत सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषि उडान योजना 2.0 ही नाशिक जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पंतप्रधान व केंद्रीय कृषिमंत्री यांचे बैठकीत आभार मानले आहेत.

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले की, कृषि उडान योजनेशी संबंधित सर्व विभागांच्या बैठका घेऊन जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या हंगामनिहाय शेतमालाच्या निर्यातीत सातत्य ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील.

या बैठकी दरम्यान नवी दिल्ली नागरी हवाई वाहतूक विभागाचे सचिव राजीव बंसल यांनी कृषि उडान योजनेची सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.