शेतकऱ्यांचा कैवारी काळाचा पडद्याआड! हरितक्रांतीचे जनक डॉ. स्वामिनाथन यांचे निधन

चेन्नई :-आज भारताच्या पहिल्या हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९८ वर्षी त्यांनी अखेरचा श्व्वास घेतला. त्यांच्या निधनानं सर्वत्र शोककळा पसरली आहे. धानाच्या जाती विकसित करण्यामध्ये स्वामिनाथन यांचं खूप मोठं योगदान होतं. एव्हढच नव्हे तर त्यांनी चेन्नईमध्ये एमएस स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशनची देखील स्थापना केली होती.

एमएस स्वामिनाथन यांचा जन्म तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यात ७ ऑगस्ट १९२५ रोजी झाला. त्यांनी भाताच्या उच्च-उत्पादक जाती विकसित करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. ज्यामुळे भारतातील कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळू शकले. १९७१ साली त्यांना मॅगसेसे पुरस्कारासह १९८६मध्ये अल्बर्ट आइनस्टाईन जागतिक विज्ञान पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं.

एमएस स्वामिनाथन यांना तीन मुली आहेत. एमएस स्वामिनाथन यांची मुलगी डॉ. सौम्या यांनी सांगितलं की, “गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. गुरुवारी सकाळी त्यांनी शांतपणे देह सोडला. ते शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि समाजातील गरीबांच्या उन्नतीसाठी काम करत राहिले. मी माझ्या कुटुंबाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण केलेल्या सर्वांचे मनापासून आभार मानते. माझे वडील आणि माझी आई मीना स्वामिनाथन यांनी उभं केलेलं काम पुढे नेण्यासाठी आम्ही तिन्ही मुली जिद्दीने काम करू”. स्वामिनाथ यांच्या जाण्याने शेती क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.