रब्बी व उन्हाळी हंगामात 02 पाणी आवर्तन देणे प्रस्तावित

औरंगाबाद, दि.24 : धरणातील पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करून प्राधान्याने पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना सुनील चव्हाण , जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष,कालवा सल्लागार समिती, औरंगाबाद यांनी येथे दिल्या.

औरंगाबाद, जालना व परभणी या जिल्ह्यास वरदान ठरलेल्या मराठवाडा विभागातील जायकवाडी, निम्न दुधना, नांदूर मधमेश्वर कालवा या मोठे प्रकल्पावरील सिंचन पाणी नियोजनासाठी प्रथम पाणीपाळी राबविणेच्या दृष्टीने कालवा सल्लागार समितीची सन 2020-21 ची बैठक सुनील चव्हाण अध्यक्ष, कालवा सल्लागार समिती, तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दि. 23 नोव्हेंबर 2020 रोजी, वेळ: दु. 3.00 वाजता, दृक्श्राव्य द्वारे संपन्न झाली. त्यावेळी त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी यांनी जायकवाडी, निम्न दुधना, नांदूर मधमेश्वर कालवा या तिन्ही मोठ्या प्रकल्पावरील रब्बी प्रथम आवर्तनासाठी यावेळी मान्यता प्रदान केली . बैठकीत प्रकल्पावरील उपलब्ध पाण्याचे रब्बी व उन्हाळी हंगामाकरिताच्या नियोजना बाबत राजेंद्र काळे, अधीक्षक अभियंता व प्रशासक तथा सदस्य सचिव,लाक्षेविप्रा यांनी सादरीकरण केले.जायकवाडी प्रकल्पाचे दोन्ही कालव्यावरील लाभक्षेत्र हे औरंगाबाद, जालना, परभणी व अहमदनगर जिल्ह्यातील आहे. या वर्षी धरणात खरीप हंगामाअंती दि. 15 ऑक्टोबर 2020 रोजीपर्यंत महत्तम 2171 दलघमी (76.66 अघफू) (100%) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे धरणावर अवलंबून असलेल्या सर्व पिण्याचे व औद्योगिक मंजूर पाणीपुरवठा योजनांना 31 जुलै 2020 अखेर पर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच गाळघट व बाष्पीभवन वजा जाता उर्वरित उपयुक्त पाणीसाठ्यावर रब्बी व उन्हाळी हंगामात अनुक्रमे 03 व 05 पाणी आवर्तन देणे प्रस्तावित असून जलाशय व डावा आणि उजवा कालव्यावर 146900 हे. व 53000 हे. क्षेत्र सिंचित करणे नियोजित आहे व त्याकरिता अनुक्रमे 618 दलघमी व 530 दलघमी असे एकूण 1148 दलघमी (41 अघफु ) पाणीवापर अपेक्षित आहे.

या बैठकीत जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावरील प्रथम रब्बी पाणीपाळी राबविणेच्या दृष्टीने पाणी सोडणे बाबत मान्यता दिलेली असुन 120000 हे सिंचन क्षेत्रासाठी 170 दलघमी पाणी देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्यावरील प्रथम रब्बी पाणीपाळी क्षेत्रीय मागणीच्या अनुषंगाने राबविणेबाबत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.नांदूर मधमेश्वर प्रकल्पावरील लाभक्षेत्र हे औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यातील आहे. या वर्षी प्रकल्पा करिता नाशिक जिल्ह्यात मुकणे, भाम, भावली व वाकी या 04 धरणे स्थिती असुन त्यामध्ये 100% पाणीसाठा उपलब्ध झालेला असुन बाष्पीभवन, घरगुती व औद्योगिक पाणीवापर, धरणाखालील बंधाऱ्यात पाणी सोडणे इ. वजा जाता उर्वरित उपयुक्त पाणीसाठ्यावर रब्बी व उन्हाळी हंगामात अनुक्रमे 02 व 02 पाणी आवर्तन देणे प्रस्तावित असून 90 दलघमी व 48 दलघमी असे एकूण 138 दलघमी पाणीवापर अपेक्षित आहे.

या वर्षी लोअर दुधना धरणात खरीप हंगामाअंती दि. 17 ऑक्टोबर 2020 रोजी महत्तम 245 दलघमी (100%) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे. धरणावर अवलंबून असलेल्या सर्व पिण्याचे व औद्योगिक मंजूर पाणीपुरवठा योजनांना 31 जुलै 2020 अखेर पर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करण्यात आलेले असुन बाष्पीभवन वजा जाता उपलब्ध उर्वरित उपयुक्त पाणीसाठ्यावर रब्बी व उन्हाळी हंगामात अनुक्रमे 03 व 03 पाणी आवर्तन देणे प्रस्तावित असून 15100 हे. व 5920 हे. क्षेत्र सिंचित करणे नियोजित आहे व त्याकरिता अनुक्रमे 100 दलघमी व 52 दलघमी असे एकूण 152 दलघमी पाणीवापर अपेक्षित आहे,असे श्री.काळे यांनी सांगितले.