बीड येथे ‘कृषी भवन’ उभारण्यास १४ कोटी ९० लाख रुपये निधी मंजूर – कृषीमंत्री धनंजय मुंडे

मुंबई,१३ सप्टेंबर /प्रतिनिधी :-कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांना कायम सर्वप्रकारची मदत एकाच छताखाली मिळावी या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बीड येथील पालवन रोड परिसरातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय येथे कृषी भवन इमारत उभारणीसाठी 14 कोटी 90 लाख रुपये निधी खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे.

पालवण रोडवरील कृषी विभागाच्या क्षेत्रात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व संबंधित आठ विभागांचे अधिनस्त कार्यालय आहेत, तर उर्वरित कार्यालय हे शहरातील अन्य ठिकाणी आहेत. ही सर्व कार्यालये एकाच छताखाली येऊन शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत व योजनांची माहिती व पूरक समस्यांचे समाधान एकाच ठिकाणी मिळावे, यासाठी कृषी भवन बांधण्याचा प्रस्ताव मंत्री श्री. मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाकडून मागवला होता.

जिल्हा कृषी विभागाने कृषी आयुक्तांमार्फत पाठवलेल्या या प्रस्तावास कृषी मंत्री श्री. मुंडे यांच्या निर्देशानुसार मान्यता देण्यात आली असून आता बीड जिल्हा कृषी भवन बांधण्यासाठी 14 कोटी 90 लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याबाबतचे ज्ञापन आज महाराष्ट्र शासनाने निर्गमित केले असून, लवकरच कृषी भवनच्या बांधकामास सुरूवात करण्यात येणार आहे.