वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांची शरद पवार यांच्याशी चर्चा

वैजापूर,१३ जुलै /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौ-यावर आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख शरदचंद्र पवार यांची  जिल्ह्यातील प्रमुख पदाधिका-यांनी भेट घेतली.

मागील महिन्यात कॉंग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रवेशा विरोधात माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांच्यासह प्रमुख पदाधिका-यांनी तीव्र विरोधाची भूमिका घेतली होती. ठोंबरे यांना पक्षात स्थान दिल्यास त्यांनी समर्थकांसह पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा गंभीर इशारा दिला होता. पवार यांच्या भेटीत या विषयावर काही चर्चा घडली का यांची उत्सुकता राजकीय वर्तुळात सुरु होती. विशेष म्हणजे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी प्रमुख पदाधिका-यासोबतच त्यांचा दक्षिण भारतातील पूर्व नियोजित बालाजी दर्शन  धार्मिक यात्रा रद्द करुन ते पवारांची स्वतंत्र भेट घेण्यासाठी औरंगाबादला थांबले होते.

राज्यातले शिवसेना कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस  महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर पवार औरंगाबादला आले होते.त्या पार्श्वभूमीवर वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर  तसेच  पैठणचे माजी आमदार संजय वाघचौरे यांनी त्यांची स्वतंत्र भेट घेऊन चर्चा केली.वैजापूरचे माजी आमदार चिकटगावकर यांच्या कडून पवार भेटीबद्दल माहिती घेतली असता त्यांनी पक्षप्रमुख औरंगाबादला आल्यानंतर पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने भेट घेण्याचे माझे कर्तव्य आहे. या भेटीत मतदार संघातील प्रश्न तसेच संघटने संदर्भात काही चर्चा घडली का यावर चिकटगावकरानी अशी कोणतीही चर्चा पवारांशी झाली नाही. त्यांनी मतदार संघातील पाऊस पाणी पीक पेरणीची स्थिती कशी आहे या संदर्भात माहिती घेतल्याचे चिकटगावकर यांनी स्पष्ट केले.या भेटीत राजकीय स्वरुपाची चर्चा झाली नाही असे त्यांनी सांगितले.