राज्यातील नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर; १८ ऑगस्टला मतदान

मुंबई : राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांचा आज अखेर बिगुल वाजला. १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून या निवडणूकीची प्रक्रीया २० जुलैपासून सुरु होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार २० जून रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करणार असून लगेच २२ ते २८ जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत. १७ जिल्ह्यातील ९२ नगरपालिका व चार नगरपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहिर केला.

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलढाणा या १७ जिल्ह्यातील ९२ नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहे. छाननी व वैध नामनिर्देशन पत्र असलेल्या उमेदवारांची यादी २९ जुलै रोजी जाहिर केली जाणार असून ४ ऑगस्ट पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे.

दरम्यान सत्ताबदलानंतर नगराध्यक्ष जनतेतून निवडावा अशी भाजपची भूमिका असल्याने राज्य शासन त्या बाबत काय निर्णय घेणार या बाबतही उत्सुकता आहे. मात्र आता निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहिर केल्याने नगरपालिकांच्या निवडणकांचा बिगुल वाजला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबाबत अनेकांच्या मनात प्रश्न होते. या निवडणुका नेमक्या कधी घेतल्या जातील? असा प्रश्न अनेकांना होता. विशेष म्हणजे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन या निवडणुकांचा मुद्दा प्रचंड गाजला होता. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अद्याप सूटलेला नाही. पण सुप्रीम कोर्टाने या निवडणुकांबाबत महत्त्वाचा आदेश दिला होता. पावसाचं नियोजन करुन आठ-पंधरा दिवसात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याच्या सूचना कोर्टाने दिला होता. कोर्टाने 17 मे रोजी याबाबतचा निर्णय दिला होता. त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायचीच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुका ऑगस्ट महिन्यात होणार असल्याने भर पावसात या निवडणुका होण्याची चिन्हं आहेत.

सुप्रीम कोर्टाने 17 मे 2022 रोजी महत्त्वाचा आदेश दिला होता. त्या आदेशानुसार जे जिल्हे पावसामुळे प्रभावित होणार नाहीत त्याठिकाणी आणि तुरळक पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम तात्काळ राबवावा. तसेच आवश्यक असल्यास परिस्थितीनुसार त्यात बदल करवेत, असे आदेश कोर्टाने दिले होते. याच आदेशानुसार भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन निवडणुकीचा कार्यक्रम ठरविल्याचं राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलं आहे.