भुकेने मरणारे लोक हे चिंतेची बाब:केंद्राने आत्मपरीक्षण करण्याची गरज-विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लगावला अप्रत्यक्ष टोला

मुंबई ,२५ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आपण हर घर तिरंगा मोहीम हाती घेतली. मात्र ही मोहीम हाती घेताना आपल्या देशात अंबानी अदानी सारखे अब्जाधीश लोक राहतात त्याप्रमाणे हजारो लोक हे भुकेने मरत आहे ही चिंतेची बाब असून या परिस्थितीचा विचार केला पाहिजे अशा शब्दांत अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारला टोला लगावताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्वातंत्राच्या गौरवशाली लढ्यावर आपले मनोगत व्यक्त केले.

१९४७ मध्ये टाचणी सुद्धा तयार न करणाऱ्या आपल्या देशाने आज प्रगती साधत उपग्रह अवकाशात सोडून जगाला आपली ताकद दाखवून दिली आहे. शेतीचे उत्पादन वाढतय मात्र शेतकरी सुरक्षित आहे का असा सवाल करत दानवे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

राजीव गांधी ते प्रमोद महाजन यांच्या कार्यकाळात देशात १९८० च्या दशकात झालेली संगणक प्रगती, टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म ते सुपर कॉम्प्युटरचा उदय याचा पाढा वाचत सतत देशात गेल्या ७५ वर्षांत प्रगती झाली नसल्याचा आरोप करणाऱ्या भाजपला अप्रत्यक्षपणे सुनावले. आपल्या देशाला भगवान श्री कृष्ण व भगवान श्रीराम, कुराण यांचा इतिहास आहे, तो इतिहास घेऊन आपण पुढे चाललो आहे. येणाऱ्या काळात सिंधू हिंदू संस्कृतीचा इतिहास जपण्याचे आव्हान आहे, खऱ्या अर्थाने गुण्यागोविंदाने आपण राहतो का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी सर्वानांच आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले.

आपण भारत मातेचा उल्लेख माता करतो. देशाला मातेचा दर्जा केवळ हिंदुस्थानाला मिळाला आहे.आपल्या देशाला २०० वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे तो भारत देश विसरू शकत नाही. या इतिहासाची प्रेरणा घेऊन आपण वाटचाल करत आहोत. आज अनेक जण म्हणतात, आम्ही उठाव केला, पण खरा उठाव हा मंगल पांडेंनी गोमातेच्या रक्षणासाठी केला होता, याची जाणीव करून देत सध्या गोमतेवरून राजकारण करणाऱ्यांना त्यांनी चिमटा काढला. महात्मा गांधीजी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रमाणेच धुळेच्या बाबू गेनू यांच्यामुळेही स्वातंत्र्य मिळाल्याची आठवण दानवे यांनी यावेळी करून दिली.  पूर्वी चारही बाजूने हिमालय व समुद्रकिनारे या नैसर्गिक सीमांच तटरक्षण भारताला होत, मात्र आता समुद्रकिनारेही सुरक्षित नसल्याचे त्यांनी सांगत सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला.हिमालयाच्या पाठीशी नेहमी सह्याद्री उभा राहिला, त्याप्रमाणे हिंदुस्थानच्या प्रगतीत महाराष्ट्र नेहमी अग्रेसर राहिला असल्याचे सांगत दानवे यांनी महाराष्ट्राचे देशाच्या प्रगतीत असलेले महत्त्व अधोरेखित केले.