त्यांचा निर्णय जनताच करेल! उद्धव ठाकरेंचे शिंदे गटाला आव्हान

मुंबई ,८ जुलै /प्रतिनिधी :- “जे आम्हांला सोडून गेले ज्यांनी आमच्यावर टीका केली त्यांच्या अंगात हिम्मत असेल तर त्यांनी पुन्हा एकदा निवडणूका घ्याव्यात त्यांचा निर्णय जनताच करेल” अशा शब्दांत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला आव्हान दिले. शिवसेनेचा धनुष्यबाण हा कुठेही जाणार नाही, हे चिन्ह शिवसेनेचे आहे आणि कायम शिवसेनेचेच राहील अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला सुनावले.

उद्धव ठाकरेंनी आपल्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधत, आज ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात ते ठाकरे कुटुंबियांवर हिणकस भाषेत गेली अडीच वर्षे बोलत होते तेव्हा कुठे होतात असा सवाल उद्दाहव ठाकरेंनी केला आहे. ” माझ्या शिवसैनिकांच्या अश्रुंचे मोल मला कुठल्याही सत्तेपेक्षा जास्त आहे ” असे बोलत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिवसैनिकांना भावनिक साद देखील घातली.
 
 
अडीच वर्षांपूर्वी आमचे ऐकले असते तर आज ही वेळ आली नसती या आदित्य यांच्या वाक्याचा पुनरुच्चार उद्धव यांनी केला. कितीही काही झाले तरी शिवसेना संपणार नाही आणि कोणी संपवूही शकणार नाही, असे कितीतरी आजपर्यंत सोडून गेले पण पक्ष राहिला आहे, पुन्हा उभादेखील राहिला आहे आताही तेच होईल असे ठाकरे म्हणाले. “गेले काही दिवस माझ्या मनात ज्या गोष्टी सुरु होत्या, जी खदखद सुरु होती, माझ्या भावनांना वाट मोकळी करून द्यायची होती म्हणून आज सगळ्यांना बोलवले मी आजही शिंदे गटाला आवाहन करतो आहे की त्यांनी येऊन बोलावं अशा शब्दांत शिंदे गटाला पुन्हा आवाहन केले आहे.