मराठवाड्यात रेल्वेची कनेक्टीव्हीटी वाढविण्यावर भर; आषाढी एकादशीनिमित्त ९ जुलै रोजी विशेष रेल्वे धावणार – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

जालना ,४ जुलै /प्रतिनिधी :- मराठवाड्यातील जनतेच्या दृष्टीकोनातून राज्यातील महत्वाच्या रेल्वे स्थानकांना जोडून सर्वसामान्यांचा प्रवास कमी पैशामध्ये व आरामदायक होण्यासाठी मराठवाड्यात रेल्वेची कनेक्टीव्हीटी वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

नांदेड ते पुणे या रेल्वेचा शुभारंभ जालना रेल्वे स्टेशन येथे राज्यमंत्री श्री दानवे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.यावेळी रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक भूपेंद्र सिंग, भास्कर दानवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, मराठवाड्यातील जनतेच्या दृष्टीकोनातून नांदेड-पुणे ही रेल्वे अत्यंत महत्वाची आहे.  यापूर्वी आठवड्यातून दोन वेळेस केवळ हडपसरपर्यंत रेल्वेची सुविधा होती.  हडपसर येथून पुणे स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वसामान्यांना अधिकचा भुर्दंड सहन करावा लागत होता.  मराठवाड्यातील नागरिकांची मागणी लक्षात घेता केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करुन जनतेसाठी सर्व सुविधांनी युक्त व अत्यंत सोईची ही दैनंदिन रेल्वे सुरु करण्यात आली आहे.  दररोज ही रेल्वे नांदेड ते पुणे दरम्यान धावणार असून सायंकाळी 7-05 वाजता ही रेल्वे जालना स्थानकातून निघून दुसऱ्या दिवशी सकाळी 5-30 वाजता ही रेल्वे पुणे येथे पोहोचणार असल्याचेही राज्यमंत्री श्री. दानवे यांनी यावेळी सांगितले.

आषाढी एकादशीनिमित्त 9 जुलै रोजी नांदेड, जालना व औरंगाबाद येथून विशेष रेल्वे

दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक पंढरपूर येथे गर्दी करतात.  या भाविकांच्या सोयीसाठी दि. 9 जुलै, 2022 रोजी पंढरपूरसाठी नांदेड, जालना व औरंगाबाद येथून विशेष रेल्वे सोडण्यात येणार असून जालना येथून सायं.7-00 वाजता ही रेल्वे जालना स्थानकातून धावणार आहे. भाविकांनी या विशेष रेल्वेचा लाभ घेण्याचे आवाहनही केंद्रीय राज्यमंत्री श्री दानवे यांनी यावेळी केले.