एकनाथ शिंदे ‘हा’ शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही! – उद्धव ठाकरे

एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्षनेते पदावरुन हकालपट्टी

शिवसेनेची एकनाथ शिंदे यांच्याविरोधात सर्वात मोठी कारवाई

मुंबई ,१ जुलै /प्रतिनिधी :- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ठाकरे यांनी “हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता स्पष्ट केले. तसेच शिवसेनेला बाजूला ठेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवता येणार नाही असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
कोरोनामुळे बऱ्याच काळानंतर आपण माध्यमांशी थेट संवाद साधत आहोत. मला आतून दुखः झालेले आहे व त्यामुळेच आपला चेहेरा पडला आहे असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. आरेचा कारशेड कांजूरमार्ग येथे हलवण्याचा निर्णय बदलू नका अशी माझी सरकारला विनंती आहे.
 भारतीय लोकशाही स्थापन होऊन ७५ वर्षे झालेली आहेत. पण आता लोकशाहीचे धिंडवडे निघालेले आहेत ते थांबले पाहिजेत. मतदाराचा मतदानावरचा विश्वास शाबूत राहण्यासाठी मतदाराला आपण मतदान केलेल्या उमेदवाराला परत बोलवण्याचा अधिकार असायला हवा. आम्ही महाविकास आघाडी सरकार स्थापन करून चूक केली होती तेव्हा आम्हालाही मतदारांना पुन्हा बोलवण्याचा अधिकार हवा होता असेही उद्धव ठाकरे यांनी मान्य केले.
 माझ्या पाठीत सुर खुपसलात तो मुंबईकरांच्या मनात भोसकू नका. आपल्याला दिलेला शब्द पाळला गेला असता तर आपण महाविकास आघाडी सोबत गेलोच नसतो. मुख्यमंत्रीपद सोडताना आपल्याबद्दल अनेकांनी सोशलमिडियाच्या माध्यमातून चांगल्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल मी सगळ्यांचा ऋणी आहे अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

शिवसेनेची एकनाथ शिंदे यांच्याविरोधात सर्वात मोठी कारवाई

शिवसेनेने बंडखोर एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना शिवसेना नेतेपदावरुन हटवलं आहे. शिवसेनेने याबाबतचं पत्र काढलं आहे. या कारवाईमुळे आता शिंदे विरुद्ध ठाकरे असा वाद चिघळण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाने एक पत्र व्हायरल होत आहे. या पत्रात एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्षनेते पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्याचं म्हटलं गेलं आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्याविरोधात खरंच मोठी कारवाई करण्यात आली की काय? याबाबतचा संभ्रम निर्माण झाला आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या लेटपॅडवरीलच ते पत्र आहे. तसेच त्या पत्रावर उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी आहे. पण त्या पत्रात इंग्रजीमध्ये मजकूर छापलेला आहे. या मजकूरमध्ये व्याकरणाच्या देखील चुका आहेत. त्यामुळे हे पत्र खरं की खोटं याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात काम केल्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येत असल्याचा उल्लेख या पत्रात आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पक्षनेते पदावरुन हटवत असल्याचं पत्रात म्हटलं आहे.