भारतीय उद्योग क्षेत्राच्या जडणघडणीतील मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ उद्योजक पालोनजी मिस्त्री यांना श्रद्धांजली

मुंबई:- शापूरजी पालोनजी उद्योग समूहाचे अध्यक्ष पालोनजी मिस्त्री यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाच्या औद्योगिक क्षेत्राच्या जडणघडणीत योगदान देणारे मार्गदर्शक असे व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, देशाच्या उद्योगक्षेत्राच्या जडणघडणीत पालोनजी मिस्त्री यांचे महत्त्वपूर्ण असे योगदान आहे. त्यांनी आपल्या समूहाच्या माध्यमातून विविध उद्योगांची उभारणी केली. वेगवेगळ्या क्षेत्रातील या उद्योगांनी देशात गुंतवणूक, रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या. यामुळे होतकरू आणि नव्या दमाच्या तरूणांमध्ये उद्योजकतेची दृष्टी  निर्माण होऊ शकली. पालोनजी यांच्या उद्योग समूहाने सामाजिक बांधिलकीही जोपासली. त्यांच्या निधनामुळे भारतीय उद्योग जगताच्या पिढ्यांना जोडणारे मार्गदर्शक असे व्यक्तिमत्व हरपले आहे. ज्येष्ठ उद्योजक पालोनजी मिस्त्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

शापूरजी पालोनजी उद्योग समूहाचे आधारस्तंभ, ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण पालोनजी मिस्त्री यांच्या निधनाने भारतीय उद्योग क्षेत्राची मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ उद्योगपती पालोनजी मिस्त्री यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, शापूरजी पालोनजी उद्योग समूहाला दीडशे वर्षांची प्रदीर्घ परंपरा आहे. बांधकाम क्षेत्रातील दिग्गज म्हणून ओळख असणाऱ्या शापूरजी पालोनजी समूहात अभियांत्रिकी, बांधकाम, पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट, पाणी, ऊर्जा आणि वित्तीय सेवा यांसारख्या व्यावसायिक विभागांचा समावेश आहे. शापूरजी पालोनजी उद्योग समूह जगभरातील पन्नास देशांमध्ये विस्तारला आहे. शापूरजी पालोनजी उद्योग समूह नावारुपाला आणण्यात पालोनजी मिस्त्री यांचा मोठा वाटा आहे. उद्योग क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या निधनाने देशाच्या उद्योग क्षेत्राची मोठी हानी झाली असून भारताने एक महान सुपुत्र गमावला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्योगपती शापूरजी पालोनजी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.