राज्यात 20 हजार पोलिसांची भरती, गृहमंत्र्याची मोठी घोषणा

मुंबई : राज्यात लवकरच पोलीस भरती करण्यात येणार आहे. ही मेगाभरती असणार आहे. तब्बल 20 हजार जागांसाठी ही भरती होणार आहे. त्यामुळे सरकारी विशेष करुन पोलिसांत भरती होण्याचं स्वप्न असलेल्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे. उपमुख्यंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.

राज्यातील हजारो तरूण गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत होते. काही दिवसांपूर्वी स्वत: देवेंद्र फडणवीस यांना तरुणांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. सरकारने तत्काळ रिक्त पदांची भरती करावी, अशी मागणी करत नांदेड येथे तरुणांनी फडणवीस यांना घेराव घातला होता. आता अखेर सरकारने या भरती प्रक्रियेबाबत मोठी घोषणा केली आहे.राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत ठराविक काही दिवसांनी गृहमंत्र्यांची बैठक होत असते. या बैठकीत उच्चपदस्थ पोलीस अधिकारी असतात. फडणवीस यांच्यासह ही महत्त्वाची बैठक पार पडली. यानंतर फडणवीस यांनी 20 हजार पोलिसांची भरती करणार असल्याची घोषणा केली. 

दुसरीकडे, राज्यात गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या विविध घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जात होता. या पार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गृहखात्याची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा झाल्यानंतर फडणवीस यांनी पोलीस दलाला सूचना दिल्या आहेत. ‘तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हे सिद्ध होण्याचा दर वाढला पाहिजे, असा आमचा प्रयत्न असणार आहे. तुरुंग विभागात काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. आपल्या तुरुंगांमध्ये असे अनेक कैदी आहेत ज्यांचा जामीन मंजूर झाला आहे, मात्र पैसे किंवा कोणी व्यक्ती नसल्यामुळे ते तुरुंगाबाहेर येऊ शकले नाहीत. अशा कैद्यांना तुरुंगाबाहेर जाता यावं, यासाठी आम्ही एनजीओंचीही मदत घेणार आहोत. ,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सायबर सुरक्षेवर अधिक भर

सध्या जमाना डीजीटलचा आहे. जवळपास सर्वच कामं ही ऑनलाईन पद्धतीने होतात. त्यामुळे सायबर सुरक्षेचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. आतापर्यंत अनेकांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीला आर्थिक नुकसान सहन करावं लागतं. तसेच महत्त्वाचे कागदपत्र ही लीक होतात. त्यामुळे फडणवीस यांनी हा मुद्दा लक्षात घेत सायबर सुरक्षेवर अधिक भर देणार असल्याचं सांगितलं. तसेच या बैठकीत सायबर गुन्हे उघडकीस आणण्याबाबत चर्चा झाली. सोबतच यासाठी एक मोहीम राबवणार आहोत, अशीही माहिती फडणवीस यांनी दिली.