वैजापूर तालुक्यात पेरण्या रखडल्या ; पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल

वैजापूर ,१७ जून  /प्रतिनिधी :- यंदा राज्यात चांगला पाऊस पडणार व वेळेपूर्वी मान्सूनचे आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. पाऊस चांगला असल्याने शेतकऱ्यांना खरीपाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.मात्र, जून महिना अर्धा सरला तरीही पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असून पाऊस कधी पडेल या चिंतेत आहे. 

खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मूग, सूर्यफूल व मका ही पिके प्रामुख्याने घेतली जात असली तरी पाऊसच नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत. तालुक्यात 17 जूनपर्यंत केवळ 44 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. वेळेपूर्वी मान्सूनचे आगमन होणार असल्याने शेतकऱ्यांनी शेतीची सर्व कामे आटोपून ठेवली आहेत.

काही शेतकऱ्यांनी पाऊस वेळेवर पडेल या आशेने बी-बियाणे आणि खतांची खरेदी केली आहे.कधी पाऊस पडतो ही चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.पाऊस वेळेवर पडला नाही तर पेरण्या लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.रिमझिम पावसावर काही शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली असली तरी पाण्याअभावी ही पिके अडचणीत येऊ लागली आहेत. तालुक्यात विहिरी व कुपनलिकांचे पाणी आटले असून प्रकल्पीय पाणी साठ्यात देखील घट झाली आहे. 

वैजापूर तालुक्यातील प्रकल्प व त्यातील आजचा पाणीसाठा – 

नारंगी मध्यम प्रकल्प – 26.41 टक्के

बोर- दहेगांव मध्यम प्रकल्प -29.11 टक्के

कोल्ही मध्यम प्रकल्प – 27 49 टक्के

बिलवणी लघु तलाव – जोत्याच्या खाली

खंडाळा लघु तलाव –   जोत्याच्या खाली 

सटाणा लघु तलाव -29.61 टक्के

गाढेपिंपळगांव लघु तलाव -10.31 टक्के

जरुळ लघु तलाव – जोत्याच्या खाली 

मन्याड साठवण तलाव -32.33 टक्के