‘अग्निपथ’ ही योजना आणून मोदी सरकारने देशातील बेरोजगार तरुणांची क्रूर चेष्टा केली आहे – महेश तपासे

नवी दिल्ली ,१७जून  /प्रतिनिधी :- ‘अग्निपथ’ ही चार वर्षांसाठी भारतीय सैन्यातील भरती म्हणजे आयुष्यभराची बेरोजगारी असून ही योजना आणून मोदी सरकारने देशातील बेरोजगार तरुणांची क्रूर चेष्टा केली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

‘अग्निपथ’ योजनेला देशभरातून तरुण पिढी विरोध करत असून राष्ट्रवादी काँग्रेसचाही या योजनेला विरोध असल्याचे महेश तपासे म्हणाले.एकीकडे ‘वन रँक, वन पेंशन’ अशी योजना आणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसरीकडे बेरोजगार तरुणांसाठी ‘अग्निपथ’ अशी योजना आणून त्यात ‘नो रँक, नो पेंशन, नो ग्रॅच्युइटी’ आणतात. त्यामुळे ही योजनाच बंद करून केंद्र सरकारने तरुणांसाठी कायमस्वरूपी योजना आणावी, अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.प्रत्येक वर्षी २ कोटी रोजगार देण्यात मोदी सरकार गेल्या आठ वर्षांत अपयशी ठरले आहे. आम्ही फक्त रोजगार दिला हे भासवण्यासाठी ‘अग्निपथ’ ही पोकळ योजना आणल्याचा आरोप करतानाच १७ ते २३ वर्ष हे तरुणांचे उमेदीचे वर्ष असून २४ किंवा २५ व्या वर्षी निवृत्त होऊन या तरुणांनी पुढे काय करायचे? असा संतप्त सवालही महेश तपासे यांनी केंद्र सरकारला केला आहे.