रोटेगावच्या तरुणास गावठी कट्टा व काडतुसांसह प्रवरासंगम येथे अटक ; नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई

वैजापूर ,९ जून  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील रोटेगाव येथील तरुणास गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसांसह प्रवरासंगम येथे अटक करण्यात आली आहे.नगर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली असून या प्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नाईक ज्ञानेश्वर शिंदे यांनी नेवासा पोलिस ठाण्यात दिलेल्या  फिर्यादीनुसार, प्रवरासंगम बस स्थानकावर एक मध्यम बांध्याचा तरुण देशी बनावटीचा कट्टा व काडतुसे विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना 4 जून रोजी मिळाली. या माहितीवरून विशेष शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश इंगळे, हवालदार दत्तात्रय गव्हाणे, मनोज गोसावी, पोलिस नाईक ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, दिपक शिंदे,कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे व हवालदार संभाजी कोतकर यांच्या पथकाने प्रवरासंगम येथे सापळा रचून सोन्या उर्फ संतोष पांडुरंग वंगाळ (वय 29 वर्ष, रा.रोटेगांव ता.वैजापूर) यास पकडले.त्याच्या ताब्यातून 30 हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल व 400 रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 459 /2022 भा.द.वि.कलम 3/25 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे.पोलिस निरीक्षक विजय करे हे पुढील तपास करीत आहेत.