“पुढं काय करावं” यासाठी राष्ट्रवादीचे माजी आमदार चिकटगावकर यांचा तालुक्यात दौरा सुरू

वैजापूर, २० नोव्हेंबर / प्रतिनिधी :-काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब ठोंबरे यांना आपल्या दोन्ही  पुतण्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश दिल्याने  नाराज असलेले वैजापूर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी “पुढं काय करावं” यासाठी जनतेच्या दरबारात जाण्याच्या निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार त्यांनी आजपासून तालुक्यातील गंगाथडी भागातून संपर्क दौऱ्यास सुरुवात केली आहे.  

ठोंबरे काका- पुतण्याच्या पक्ष प्रवेशाला माजी आमदार चिकटगांवकर यांचा विरोध असतांना तसेच त्यांना विश्वासात न घेता पक्षश्रेष्टीकडून जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब पाटील ठोंबरे व त्यांचे दोन पुतणे जिल्हा परिषद सदस्य पंकज पाटील ठोंबरे व मर्चंट बँकेचे उपाध्यक्ष विजय उर्फ उल्हास पाटील ठोंबरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यात आला. त्यामुळे माजी आमदार चिकटगांवकर व त्यांच्या समर्थकांनी ठोंबरे यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध दर्शवून सर्व पर्याय खुले असल्याचे सांगितले होते.