श्री रूक्मिणीमातेची पालखी पंढरपूरला मार्गस्थ

श्री रूक्मिणीमातेची पालखी पंढरपूरला मार्गस्थ; पालकमंत्र्यांच्या हस्ते पूजन

श्री क्षेत्र कौंडण्यपूर (जि. अमरावती) : विदर्भातील 427 वर्षांची प्राचीन परंपरा असलेली श्री रुक्मिणी मातेची पालखी श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे रवाना झाले. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी श्री रुक्मिणीमातेची पालखी खांद्यावर वाहून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ केली.

पालखीचा घोडा, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झालेल्या वारकरी भगिनी, सुशोभित रथ, टाळ-मृदंगाचा निनाद, ‘ज्ञानबा तुकाराम’चा जय घोष अशा उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात पालखीने मार्गक्रमण सुरु केले. यावेळी भक्तिमय अभंगवाणी व टाळमृदंगाच्या साथीने आसमंत निनादून गेले होते. कोविड साथीमुळे दोन वर्षाच्या निर्बंध संपल्यानंतर मुक्त वातावरणात पालखी निघाल्यामुळे वारकरी बांधवांमध्ये उत्साह संचारला होता.

पालकमंत्री ॲड. ठाकूर यांच्या हस्ते प्रारंभी पालखीचे पूजन झाले. पालकमंत्र्यांनी श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी भक्त भगिनींसमवेत फुगडी खेळली व पालखी खांद्यावर वाहून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ केली.

श्री कौंडण्यपूर येथील पालखीला मोठी परंपरा आहे. दोन वर्षानंतर पायी वारी निघत असल्याचा मोठा आनंद आहे. रुक्मिणी माता माहेरवरून सासरला निघाली आहे. ‘राज्यात यंदा सर्वत्र चांगला पाऊस होऊ दे. धनधान्य पिकू दे. बळीराजा समृद्ध होऊ दे. सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे’, अशी प्रार्थना पालकमंत्र्यांनी यावेळी केली.

पालखीच्या स्वागतासाठी अमरावती येथे 6 जूनला कार्यक्रम होईल. यावेळी तीन रूग्णवाहिकांचे लोकार्पणही होणार आहे. त्यातील एक रुग्णवाहिका पालखीसमवेत जाणार आहे. डॉक्टरसमवेत सर्व उपचार सुविधा त्यात उपलब्ध असतील. पालखीसमवेत पाण्याच्या टँकरचेही नियोजन करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी ह. भ. प. संजय महाराज ठाकरे, ह. भ. प. नामदेवराव अंबाडकर, ह. भ. प. वसंतराव डाये यांच्यासह अनेक मान्यवर व भक्तगण उपस्थित होते.