ग्रामीण युवकांना मिळणार कॅपजेमिनीकडून प्रशिक्षण

मुंबई,३ जून  /प्रतिनिधी :- राज्यातील ग्रामीण भागातील युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी कॅपजेमिनी कंपनी डिजीटल अकॅडमीच्या माध्यमातून प्रशिक्षण देणार आहे. याबाबत राज्याचे कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे यांच्या समोर कंपनीच्यावतीने सादरीकरण करण्यात आले.

सह्याद्री अतिथी गृहात आज झालेल्या बैठकीत कॅपजेमिनी कंपनीचे डिजिटल इन्क्लुजन विभागाचे उपाध्यक्ष अनुराग प्रताप यांनी याबाबत सादरीकरण केले. राज्याच्या ग्रामीण भागातील युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी काही प्रशिक्षण आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना कौशल्य देण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. कॅपजेमिनी कंपनी डिजीटल अकॅडमीच्या माध्यमातून हे प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे.

कंपनीचा उपक्रम चांगला आहे. ग्रामीण भागातील युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी, चांगली संधी मिळण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल असा विश्वास श्री.टोपे यांनी व्यक्त केला. सध्या कंपनीच्यावतीने राज्यातील बारा महाविद्यालयात हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. त्याची उपयुक्तता सिद्ध झाल्यास राज्यातील विविध जिल्ह्यांत हा उपक्रम राबविण्याचा मानस आहे.

यावेळी कॅपजेमिनी कंपनीच्या सीएसआर विभागाच्या मुख्य अधिकारी शोभा मीरा, आरती श्रीवास्तव, ऋता साटम आदी उपस्थित होते.