” स्वर्वेद ” हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ

योग ही संपूर्ण विश्वाला भारताकडून मिळालेली देणगी आहे !
सृष्टी उत्पत्ति काळापासून मानवाच्या सर्वांगीण विकास आणि संपूर्ण कल्याणार्थ जो एकमेव योगमार्ग प्रचलित आहे त्याचे नाव विहंगम योग आहे. विविध कालखंडात हा योगमार्ग वेगवेगळ्या नावांनी प्रचलित होता. वैदिक काळात यास मीन मार्ग तर उपनिषद काळात देवयान पथ नावाने संबोधले गेले. दिग्भ्रमित अर्जुनास याच ज्ञानाचा उपदेश भगवान श्रीकृष्णांनी युद्धभूमीवर केला ज्याचा उल्लेख ब्रह्मविद्या योगशास्त्र नावाने भगवद्गीतेत आढळतो. कालौघात लोप पावलेल्या या ज्ञानास महर्षि सदाफल देवजी महाराजांनी आपल्या सतरा वर्षांच्या कठोर तपोसाधनेद्वारे पुनर्स्थापित केले ज्याचा प्रचार- प्रसार ई. सन १९२४ पासून सुरू आहे. भारताबरोबर विश्वातील जवळपास ५० पेक्षा जास्त देशांत आजमितीस याचा प्रचार झालेला आहे .
याच्यात तत्वज्ञान आणि पाच क्रमिक साधनाप्रणाली आहेत. मनोनिग्रहापासून सुरू होणारी याची साधना अंतिम ध्येय परमेश्वर प्राप्ति पर्यंत घेऊन जाते. विहंगम योगाची साधना जिज्ञासूंना निःशुल्क शिकविली जाते.

” स्वर्वेद ” हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे ज्याची रचना महर्षि सदाफलदेवजींनी स्वानुभवाच्या आधारे केली. ही हिंदीतील दोहा स्वरूपात असून याचे भाष्य प्रथम परंपरा सद्गुरू आचार्य धर्मेचन्द्रदेवजी महाराजांनी लिहिले आहे.अध्यात्म जगतातील या अद्वितीय महाग्रंथाचा परिचय जनसामान्यांना व्हावा हा प्रांजळ उद्देश आहे .

” स्वर्वेद ” हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका आजपासून “आज दिनांक “मध्ये रोज खास वाचकांसाठी.

स्वर्वेद प्रथम मण्डल प्रथम अध्याय

चित चेतन सत्ता रहे, ज्ञान असीम अनन्त ।
ज्ञान योनि मय पूर्ण है, चित् स्वरुप भगवन्त ।।०२।। (स्वर्वेद प्रथम मण्डल प्रथम अध्याय)

मुळ भाष्याचा मराठी अनुवाद :
परब्रह्म नित्य चेतन अस्तित्वाने सदैव प्रकाशमान आहे. ती कुटस्थ सत्ता सदैव एक रूपात विद्यमान असते; त्यामध्ये ऱ्हास, विकास होत नाही. त्याचा स्वभाव-गुण-क्रिया अनन्त, अनादि आहे. ती सर्वव्यापी अनन्त सत्ता समस्त ज्ञानांचं कारण आहे तसेच समस्त शास्त्रांचा योनिमूलाधार आहे. ज्ञानस्वरूप प्रभू चेतन एक रस सर्व व्यापक आहे.