वडिल आणि सावत्र आईची निघृर्ण हत्‍या:मुलाला २८ मेपर्यंत पोलिस कोठडी

औरंगाबाद ,२४ मे /प्रतिनिधी :-घरगुती आणि कपड्याच्‍या दुकानातील रोजच्‍या व्‍यवहारावरुन होणाऱ्या  वादातून रागाच्‍या भरात वडील आणि सावत्र आईची निघृर्ण हत्‍या करणाऱ्या नराधम मुलाला गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने सोमवार दि.२३ शिर्डीतून अटक केली. नराधमाला २८ मेपर्यंत पोलिस  कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए.एन. माने यांनी मंगळवारी दि.२४ दिले.

देवेंद्र शामसुंदर कलंत्री (२६) असे आरोपीचे नाव आहे. तर शामसुंदर हिरालाल कलंत्री (६१) आणि अश्विनी शामसुंदर कलंत्री (४५, सर्व रा. गजानन नगर, पुंडलिकनगर) अशी हत्या झालेल्या दाम्पत्याची नावे आहे. 

प्रकरणात आरोपीची सावत्र बहिण वैष्‍णवी कलंत्री (१९) हिने फिर्याद दिली. त्‍यानूसार शामसुंदर यांचे तीन लग्न झाले असून त्‍यांच्‍या पहिल्या पत्‍नीचा मुलगा देवेंद्र आहे. पहिल्या पत्‍नीच्‍या निधनानंतर शामसुंदर यांनी दुसरे लग्न केले, मात्र दुसऱ्या  पत्‍नीने त्‍यांना सोडून दिले. त्‍यामुळे त्‍यांनी तिसरे लग्न फिर्यादीची आई अश्विनी यांच्‍याशी केले होते. मृत दाम्पत्याचे पुंडलिकनगरात बालाजी क्लॉथ स्टोर नावाने दुकान आहे. दुकान चालविण्‍यासाठी आरोपी मदत करित होता. मात्र वडील व आरोपीमध्‍ये घरगुती आणि दुकानातील व्‍यवहारावरुन किरकोळ वाद होत होता. घटनेच्‍या १५ दिवसांपूर्वी देखील दुकानातील व्‍यवहारावरुन वडील व आरोपीमध्‍ये वाद झाला होता. आरोपीने हा कोणाला ही न सांगता दुकानातून पैसे काढून घेत व ते पैसे त्‍याच्‍या सोबत संबंध असलेल्या एका महिलेला देत होता, अशी माहिती आई-वडिलांना मिळाली होती. त्‍यामुळे वडिलांनी त्‍याच्‍याकडील फोन काढुन घेतला होता.

या नेहमी होणाऱ्या  वादातून चिडलेल्या आरोपीने शनिवारी दि.२१ आई- वडिलांची हत्या केली. हत्येनंतर आरोपीने कॉलेजला गेलेल्या फिर्यादीला वडिलांच्‍या फोनवरुन कॉल व मॅसेज करुन वडिलांच्या मित्राचे निधन झाल्याची खोटी माहिती देत आम्ही सर्व धुळ्याला जात आहोत, तू हडकोतील काकाकडे राहायला जा असे सांगितले. बहिणीने देखील देवेंद्रच्या बोलण्यावर विश्वास ठेवत काकाकडे हडकोत गेली. दुसर्या दिवशी आई-वडीलांना बोलण्‍यासाठी फिर्यादीने त्‍यांना फोन केला असता आरोपीने वडिलांच्‍या आवाजाची नक्कल करुन वेळ मारुन नेली. फिर्यादीला शंका आली, त्‍यानंतर ती वेळोवेळी आई-वडिलांना फोन लावत मात्र आरोपी तिला  आम्ही निघालो, वेळ लागेल, चाळीसगावात आहे, घाटात आहे असे सांगून वेळ मारुन नेत होता. फिर्यादी वारंवार फोन लावत होती, तेव्‍हा सायंकाळी सव्‍वा सहा वाजेच्‍यासुमारास आरोपीने आम्ही घरी येत आहोत, तु घरी ये असे फिर्यादीला सांगितले. त्‍यानूसार फिर्यादी घरी गेली, घरी कोणीच नसल्याने तिने आरोपी व आई-वडिलांना फोन केला मात्र सर्वांचे मोबाइल बंद होते. त्‍यानंतर फिर्यादी मैत्रिणच्‍या घरी गेली.

दुसऱ्या दिवशी फिर्यादी ही मैत्रिण व तिच्‍या आईसह घरी पोहचली. घराला कलुप असल्याने फिर्यादीने शेजाऱ्याच्या गच्चीवरून घराच्‍या जिन्‍यात गेली. तेव्‍हा घरात रक्त दिसल्याने तिने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घराचे कुलूप तोडून आरोपीने घरात लपवलेले मृत देह बाहेर काढले. प्रकरणात पुंडलिकनगर पोलिस  ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी यापूर्वी देखील आरोपी विरोधात करमाड पोलिस ठाण्‍यात एक गुन्‍हा दाखल आहे.  आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत काय, त्‍याला गुन्‍ह्यात कोणी मदत केली याचा तपास करयाचा आहे. गुन्‍हा केल्यानंतर आरोपी कोठे-कोठे थांबला होता, आरोपीची ती मैत्रीण कोण याचा देखील तपास करायचा असल्याने आरोपीला पोलिस  कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयकाडे केली.