तरुणाचा चाकू भोसकून खून करणारा आरोपी अटकेत

औरंगाबाद ,२० मे /प्रतिनिधी :- क्षुल्लक कारणावरुन झालेल्‍या भांडणानंतर तरुणाचा चाकू भोसकून खून करणारा आरोपी मेराज खान रफिक खान (४६, रा. समतानगर) याला शुक्रवारी दि.२० मे रोजी क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली. त्‍याला शनिवार दि.२१ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रभारी मुख्‍य न्‍यायदंडाधिकारी एस.एन. मोरवाळे यांनी दिले.

प्रकरणात मयत शेख कादर शेख बरकत यांचा भाऊ शेख अमजत शेख बकरत (३९, रा. समातनगर) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, १५ मे रोजी दुपारी दोन वाजेच्‍या सुमारास शेख कादर आणि आरोपी मेराज खान यांच्‍यात शुल्लक कारणावरुन भांडण झाली होती. त्‍यावेळी फिर्यादीने मध्‍यस्‍थी करुन ती भांडण सोडवली होती. मात्र सायंकाळी साडेपाच वाजेच्‍या सुमारास क्रांतीचौक परिसरातील गायत्री चाट भंडार समोर आरोपीने शेख कादर याला शिवीगाळ करुन पोटात चाकू भोसकला. शेख कादर याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्‍यात आले असता, उपचार सुरु असताना १९ मे रोजी कादरचा मृत्‍यू झाला. प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्‍यात आरोपी मेराज खान याच्‍या विरोधात खूनाचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील दत्तात्रय काठुळे यांनी आरोपीने गुन्‍ह्यात वापरलेला चाकू हस्‍तगत करायचा आहे. गुन्‍हा करण्‍यामागे नेमाक हेतू काय होता, आरोपीने गुन्‍हा कोणाच्‍या सांगण्‍यावरुन केला, आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत काय याचा तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.