मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत गठित पथकाच्या माध्यमातून अनिष्ट विधवा प्रथा निर्मूलनसाठी प्रयत्न करा – मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

मुंबई,२० मे /प्रतिनिधी :- पतीच्या निधनानंतर महिलांचा सन्मान आणि त्यांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने मिशन वात्सल्य अंतर्गत गठित वार्डस्तरीय व ग्रामस्तरीय पथकांनी समाजात प्रचलित असलेल्या विधवा प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी जनजागृती व कृतिशील प्रयत्न करावेत, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले.

समाजामध्ये पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढली जाणे यांसारख्या कुप्रथा प्रचलित आहेत. पतीचे निधन झाल्यानंतर त्याच्या पत्नीला विधवा म्हणून समाजात वावरत असताना अवहेलनेस सामोरे जावे लागते. या महिलांना त्यानंतर समाजात ठराविक धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ दिले जात नाही. या कुप्रथांचे पालन होत असल्याने अशा महिलांच्या प्रतिष्ठेने जीवन जगण्याच्या मानवी हक्कांचे तसेच त्यांना प्राप्त घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन होते. या महिलांना इतर महिलांप्रमाणे सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. यामुळे अशा प्रथेचे निर्मूलन होणे आवश्यक आहे. तसेच त्याबाबत समाजात व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे.

मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत पथकातील सदस्यांनी वॉर्डमध्ये/ गावामध्ये विवाहित पुरुषाच्या मृत्यूची घटना घडल्यावर त्याच्या कुटुंबाला भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन करावे. व त्यानंतर या प्रथेच्या अनिष्ट परिणामांबाबत कुटुंबियांचे प्रबोधन करावे. पतीच्या निधनामुळे आधीच दुःखात असलेल्या महिलेवर विधवा प्रथेमध्ये समाविष्ट कृतीमुळे भावनिकदृष्ट्या जास्त अनिष्ट परिणाम होत असल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आणून द्यावे.  या प्रथेमुळे आपल्याच कुटुंबातील एका सदस्यावर अन्याय होतो, तिचा सन्मान कमी होतो, समाजातील तिचे स्थान दुय्यम बनते, तिचा दोष नसतानाही काही सामाजिक धार्मिक कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी तिला मनाई करण्यात येते. याबाबतीत कुटुंबातील सदस्यांचे संवेदीकरण करावे. या प्रथा न अवलंबण्याबाबत कुटुंबियांचे मन वळविण्याचा प्रयत्न करावा.

आपल्या गावातील/वॉर्डमधील लोकप्रतिनिधी तसेच अन्य प्रतिष्ठित व्यक्तींशी संपर्क साधून विधवा प्रथेच्या निर्मूलनाबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांचे सहकार्य घ्यावे. विधवा प्रथा निर्मूलनाबाबत ग्रामपंचायत हेरवाड, जिल्हा कोल्हापूर यांनी केलेल्या ठरावाप्रमाणे आपापल्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे ठराव पारित करणेबाबत संबंधित स्थानिक स्वराज्य संथांचे पदाधिकारी तसेच विविध समाजातील विश्वस्तांना प्रोत्साहित करावे, असे निर्देश  मंत्री ॲड. ठाकूर यांनी दिले आहेत. याबाबत महिला व बालविकास विभागाचा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आला आहे.